एकनाथ शिंदे हे बंडापूर्वी ‘मातोश्री’ निवासस्थानी आले होते. तिथे ते येऊन रडले, असा दावा शिवसेना ( ठाकरे गठ ) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मला भाजपाबरोबर जावं लागेल. अन्यथा ते मला अटक करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावरून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
“आदित्य ठाकरेंचा पोरखेळ संपलेला दिसत नाही. सत्ता गेल्यावर त्यांना शहाणपण येईल, असे वाटत होतं. एकनाथ शिंदे हे रडणारे नाहीत, तर लढणारे नेते आहेत. त्याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे. सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेत की, त्यांना रडू आवरत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा ‘पप्पू’ होऊ नये, एवढी काळजी त्यांनी घेतली पाहिजे,” असं विखे-पाटील यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा : “माझ्या भीतीने हे लोक…”, संजय राऊतांचा नागपुरातून भाजपा नेत्यांना टोला
याला आता खासदार अरविंद सावतं यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “राधाकृष्ण विखे-पाटील म्हणजे रोज रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहेत. आज या पक्षातून उद्या त्या पक्षात उड्या मारतात. शिवसेनेतही होते. कोणता पक्ष शिल्लक राहिल का विचारा,” असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.
हेही वाचा : “आपण हिंदुस्थानात राहतो, त्यामुळे भाजपाने हिंदू राष्ट्राचा…”, नाना पटोलेचं आव्हान
याप्रकरणावर खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं होतं. “आदित्य ठाकरे बोलले हे १०० टक्के खरं आहे. एकनाथ शिंदे माझ्याकडेही येऊन, असं म्हणाले होते. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या मनात आणि डोक्यात तुरुंगाची भीती स्पष्टपणे दिसत होती,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.