कोल्हापूरमध्ये राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आज (२९ डिसेंबर) दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली. सकाळी साडेनऊच्या दरम्यान राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अपघाताने सर्व्हिस गेट ओपन झाले. यामुळे नदीपात्राची पाणी पातळी अचानक वाढली. यानंतर नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
जलसंपदा विभागाच्या अथक परिश्रमानंतर राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश आलं आहे. कोल्हापूरकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
नेमकं काय झालं होतं?
कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचे दरवाजे मंगळवारी (२९ डिसेंबर) सकाळी नियमित तांत्रिक कामासाठी उघडण्यात आले. मात्र यापैकी एक दरवाजा काम सुरू असताना उघडून अडकला. यामुळे भोगावती नदी पात्रात अचानक जास्त पाण्याचा विसर्ग सुरू झाला. याच पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
दरवाजा उघडा राहिल्याने भोगावती नदीत अधिक पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. ही परिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांनी पाण्यात उतरण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले.
राधानगरी धरणाचा दरवाजा १८ फूटांवर अडकला होता. त्यामुळे त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊ लागला आहे. हा धोका दूर करण्यासाठी कोल्हापूरहून पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी या विषयासंदर्भात घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं. धरणाच्या दरवाजाची दुरुस्ती करण्यासाठी तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अखेर दुपारी सव्वातीन वाजता दरवाजा बंद करण्यात यश आलं.
हेही वाचा : कोल्हापूर : धक्कादायक! मुलाच्या उपचारांचा खर्च परवडत नसल्याने पित्यानं ५ वर्षांच्या चिमुकल्याला नदीत फेकलं!
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी, “राधानगरी धरण गळती घटनेची जलसंपदा विभागाकडून चौकशी करण्यात येईल,” अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.