कोल्हापूरच्या सीमेवरील कोवाड गावात रविवारी खासगी जागेत प्रार्थनेसाठी जमलेल्या नागरिकांवर अज्ञात टोळक्याने हल्ला केला होता. कर्नाटकातील कट्टरपंथीय संघटना या हल्ल्यामागे आहे असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. धारदार शस्त्रांनी केलेल्या या हल्ल्यात आठ जण जखमी झाले. तिघांच्या डोक्याला मार लागला तर पाच जण फ्रॅक्चर झाले.

कोवाडमध्ये गावच्या मुख्य भागापासून काही अंतरावर सुमित्रा दशरथ जाधव यांचे दुमजली घर आहे. या घराच्या तळमजल्यावर भीमसेन आणि स्वाती चव्हाण (वय ३६) हे पत्नीसह राहतात. भीमसेन यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याच्या इराद्याने हा हल्ला झाला. रविवारची प्रार्थनसभा उधळून लावण्याचा या हल्ल्याचा उद्देश होता. या भागात अनेक कट्टरपंथीय संघटना कार्यरत आहेत. आपले महत्व वाढवण्यासाठी या प्रार्थनसभेला लक्ष्य करण्यात आले असे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.

भीमसेन चव्हाण यांनी चंदगड पोलिसात हल्ल्याची फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी स्वत:ला हिंदू असल्याचे म्हटले आहे. भीमसेन हे आपण समाजकार्य करतो असे म्हणतात. समाजकार्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की ‘मी लोकांना सरळमार्गी जीवन कसे जगायचे याचे समुपदेशन करतो. त्याची उपासना लोकांकडून करवून घेतो. त्यात धार्मिक असे काही नाही. मात्र, उपासनास्थळी येशूंची प्रतिमा कशासाठी असे विचारले असता येशूंद्वारे आम्हाला शांती मिळत असल्याने प्रतिमा ठेवून मार्गदर्शन करतो,असे उत्तर देतानाच धर्मातराचे काम केले जात असल्याचा मुद्दा त्यांनी फेटाळून लावला. हल्ला कोणी नि का केला याचे कारण माहीत नसल्याचे सांगत भीमसेन यांनी पोलीस तपासाकडे बोट दाखवले.

 

Story img Loader