खादी ग्रामोद्योग क्षेत्रात ६० वर्षे कार्यरत असणारे रघुनाथ कुलकर्णी यांचे कोल्हापूरात अल्प आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
कर्नाटकच्या सीमाभागात जन्म झालेल्या कुलकर्णी यांचे बालपण वर्धा येथे महिलाश्रमात म. गांधी, विनोबा भावे यांच्या संस्कारी वातावरणात गेले. १९५५ पासून ते खादी ग्रामोद्योग मंडळात सेवेला लागले. खादीच्या संशोधन विभागात त्यांनी खादी टिकाऊ, अधिक उत्पादक होण्यासाठी चरखा, माग, डिझाइन, रचना यात सुधारणा केल्या. खादी, रेशम, लोकर, समन्वय इत्यादी प्रशासकीय विभागांचे संचालक म्हणूनही काम केले. देशभरातल्या खादी उत्पादक संस्थाशी ते संपर्कात होते. महाराष्ट्र सेवा संघ, कलानिकेतन या संस्थामध्ये ते कार्यरत होते. खादीशी जुळले नाते हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी सुलभा, जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या कार्यकर्त्या सुनिती सु.र., सृजन आनंदशी संबंधित सुचिता पडळकर या दोन मुली, मुलगा निवृत्त प्रा. सुनील कुलकर्णी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.