सचिन तेंडुलकर चोवीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर अखेरचा दोनशेवा कसोटी सामना खेळून निवृत्त होणार आहे. मुंबईतील अखेरचा सामना ‘सचिनमय’ करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनसह अनेक क्रीडाप्रेमींनी कंबर कसली आहे. या निमित्ताने एखाद्या क्रीडा संकुलाला सचिनचे नाव देण्यापासून त्याची छबी असलेली सुवर्णमुद्रा, मेणाचा पुतळा, त्याच्या कारकिर्दीवरील पुस्तक अशा नावीन्यपूर्ण संकल्पना साकारल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हरयाणातील रोहतक येथे सचिनच्या अखेरच्या रणजी सामन्याच्या वेळी हरयाणा क्रिकेट असोसिएशनने सचिनचे चित्र स्टेडियममध्ये लावण्यात आले. हे चित्र तयार करण्याचा मान सोलापूरचा युवा चित्रकार रोहन पोरे यास मिळाला.
    सचिनची लहानपणीची व सद्याची अशा दोन भावमुद्रा ६ बाय ३ फूट आकाराच्या या चित्रात अतिशय तरलपणे चितारण्यात आल्या आहेत. या चित्राचे अनावरण क्रिकेटचा देव सचिन याने स्वत केले. चित्र पाहून तो भारावून गेला. त्यावर त्याने स्वाक्षरीही केली. यावेळी सचिनने रोहनच्या चित्राचे कौतुक केले व त्याला भेटण्याचीही इच्छा प्रदíशत केली.     
    सचिनच्या अखेरच्या रणजी सामन्याच्या निमित्ताने हरयाणाच्या चौधरी बन्सीलाल स्टेडियममध्ये सचिनचे चित्र करायची संधी आपणास मिळाली. सचिननेही चित्राचे भरभरून कौतुक केले आणि त्यावर स्वाक्षरी केल्यामुळे आपली मेहनत सफल झाली, अशी प्रतिक्रिया चित्रकार रोहन पोरे यांनी व्यक्त केली. हरयाणा क्रिकेट असोसिएशन आणखी काही नामवंत क्रिकेटपटूंची चित्रे माझ्याकडून काढून घेणार आहे. हा समस्त सोलापूरकरांचा सन्मान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
    रोहन पोरे हे प्रतिभावंत व पिढीजात युवा चित्रकार असून दिवंगत ज्येष्ठ चित्रकार उमेश्वर पोरे यांचे ते नातू आहेत. चित्रकार रविकिरण पोरे व दिवंगत चित्रकार चंद्रकांत पोरे यांचे ते पुतणे आहेत. रविकिरण पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहनची चित्रकला बहरली आहे. त्यांच्या चित्रकलेचे अनेक दिग्गजांनी कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा