ज्या ज्या वेळी देशावर संकटे आली तेव्हा काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी पलायनवादीच भूमिका घेतली. जे संकटांचा सामना करू शकत नाहीत ते देशाचे नेतृत्व काय करणार, असा प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आता भाजपच्या रेल्वेला नरेंद्र मोदी यांचे इंजिन लागल्याने ही रेल्वे थांबवण्याची हिंमत कोणातच नाही, मोदी व राहुल गांधी यांची तुलनाच होऊ शकत नाही, असे अाव्हान दिले.
भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्य़ाचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे ‘चैतन्य मेळावा’ आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. फडणवीस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली. या दोन्ही पक्षांमुळे देशात आणि महाराष्ट्रातही अराजक निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
मध्य प्रदेश व गुजरात या दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आहे, ही दोन्ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा कशी सुधारलेली आहेत, याची शेती, उद्योग, रोजगारविषयक आकडेवारी फडणवीस यांनी या वेळी सादर केली. ते म्हणाले की, देशावर ज्या, ज्या वेळी संकटे आली, तेव्हा राहुल गांधी यांनी पलायनवादी भूमिका घेतली. केवळ भाजप व मोदीच देशाच्या संकटात पुढे धावले. जनलोकपाल विधेयकासाठी व दिल्लीत निर्भयासाठी सारी तरुणाई रस्त्यावर उतरली होती, त्याही वेळी राहुल गांधी तरुणांना भेटले नाहीत की सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपचे नेते व मोदी मात्र त्यांना भेटले. उत्तराखंडात महाप्रलय आला, मोदी तेथे मदतीसाठी धावले, मात्र राहुल गांधी सुट्टीसाठी विदेशात गेले.
देशात व राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार स्वैराचारी, दुराचारी, भ्रष्टाचारी झाल्याने जनतेत निराशा पसरली आहे. दोन्ही पक्षांच्या दलालांच्या साखळीत शेतकरी व त्यांचा शेतीमाल सापडला आहे, भाववाढ होते आहे, मात्र त्याचा फायदा शेतक-यांना मिळत नाही. सरकारचे डोके ठिकाणावर नसल्याने शेतक-यांची वीज कट केली जात आहे, दुसरीकडे मोठय़ा कारखानदारांकडे हजारो कोटी रुपयांची थकबाकी असतानाही त्यांची वीज कट केली जात नाही. देशाची तिजोरी रसातळाला गेल्याने बेरोजगारीत वाढ होते आहे, घोटाळेबाज सरकारने केवळ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तिजो-या भरल्या, देशाची तिजोरी रिकामी केली, असा आरोप फडणवीस यांनी केला.
अन्नसुरक्षा विधेयक म्हणजे गरिबांच्या ताटातील भाकरी ओढण्याचा प्रयत्नच काँग्रेसने केल्याचा आरोप करताना फडणवीस म्हणाले, की या विधेयकामुळे सोनिया, राहुल व मनमोहनसिंग यांना देशातील गरीब जनता सरकारने केलेले हजारो कोटी रुपयांचे घोटाळे विसरेल, असे वाटते आहे, अशी टीका त्यांनी केली.
या वेळी खासदार दिलीप गांधी, आ. राम शिंदे, आ. शिवाजी कर्डिले, रघुनाथ कुलकर्णी यांची भाषणे झाली. शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर व जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी संघटनात्मक कामाचा आढावा सादर केला.  सुनील रामदासी यांनी स्वागत केले. मेळाव्यास मोठय़ा संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते, तत्पूर्वी फडणवीस यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
दोन लाल दिवे
मेळाव्यात बूथ समित्यांचा आढावा घेताना प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी बूथ प्रमुखांची झाडाझडती घेतली. समित्यांच्या रचनेचे जिल्ह्य़ात केवळ ५० टक्केच काम झाले आहे, उर्वरित काम ‘करो या मरो’ पद्धतीने १० दिवसांत करा अन्यथा राजीनामे देऊन चालते व्हा, असा इशारा त्यांनी दिला. प्रदेशाध्यक्षांनी भाषणात राज्यात सरकार आल्यास बु-हाणनगर (कर्डिले) व कर्जतला (राम शिंदे) लाल दिव्याच्या गाडय़ा मिळतील, असे अाश्वासन देऊन टाकले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा