काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचे आज (१२ मार्च ) महाराष्ट्रात आगमन झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यासाठी काँग्रेस पक्षाकडून मोठी तयारी करण्यात आली होती. भारत जोडो न्याय यात्रा १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च ठाणे आणि १६ मार्चला मुंबईत पोहोचणार आहे. तर १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्क मैदानावर होणार असून यावेळी महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडणार आहे.
या सभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्यावतीने आज पत्रकार परिषद घेत भारत जोडो न्याय यात्रेची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर जोरदार टीका केली. “भाजपाने कितीही लोकांचे घर फोडले, तरी त्यांचे घर रिकामेच राहील. मोदींची सुसाट चाललेली गाडी कोणाला तरी ठोकणार…”, असे प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांनी दिले.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले ?
“भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात मणिपूरमधून झाली. जवळपास १५ राज्ये आणि १०० जिल्ह्यांमधून या यात्रेने प्रवास केला आहे. आता ही यात्रा नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात येत आहे. १५ राज्ये आणि १०० जिल्ह्यांचा प्रवास करताना राहुल गांधी यांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे. १७ तारखेला इंडिया आघाडीची मुंबईत भव्य रॅली आणि ऐतिहासीक सभा होणार आहे”.
हेही वाचा : मोठी बातमी! वसंत मोरेंचा मनसे आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र, मध्यरात्री केली होती ‘ती’ पोस्ट
“या सभेच्या माध्यमातून खोटारड्या केंद्र सरकारला ‘चले जाव’चा नारा दिला जाणार आहे. मोदी सरकार देशाला उध्वस्त करण्याचे काम करत आहे. देशातील जनतेमध्ये प्रचंड चीड आहे. मतदानातून या सरकारला घरी कसे पाठवता येईल? याची सर्वजण वाट पाहत आहेत. सीबीआय, ईडीचा वापर करून भितीचे वातावरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. विरोधी पक्षाचे नेते पळवायचे, पक्ष फोडायचे, अशा प्रकारचे यांचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडले, तरीदेखील भाजपाला म्हणावे तेवढे यश मिळण्याची शक्यता नाही. भाजपात सध्या एवढी अस्वस्थता आहे, त्यांना महायुतीचे उमेदवार घोषीत करताना नाकीनऊ येत आहेत. पण तुम्ही कितीही लोकांचे घर फोडले तरी तुमचे घर रिकामेच राहणार आहे”, अशा शब्दात वडेट्टीवारांनी भाजपाला सुनावले.
“सुसाट चाललेली गाडी कोणाला तरी ठोकणार…”
“महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत लवकरच मार्ग निघेल. पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मोदींची गाडी सुस्साट चालली आहे’, आता सुस्साट चाललेली गाडी कोणाला तरी ठोकणार आहे, म्हणजे सुस्साट चाललेल्या गाडीवर कंट्रोल नसतो ना? आमची गाडी हळूहळू चालते, त्यामुळे गाडीही नियंत्रणात राहील आणि गाडीतून जाणारे-येणारे देखील सुरक्षित राहतील”, असे वडेट्टीवार म्हणाले.