काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. याच पदयात्रेदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधीं यांनी, महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यातील युवकांचा रोजगार, त्यांचे भवितव्य हिरावून घेत आहेत अशी टीका बुधवारी राहुल गांधींनी नांदेडमधील सभेत केली. मात्र राजकीय टीकेव्यतिरिक्त राहुल गांधींनी एका ठिकाणी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिल्याने कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड या अभेद्य किल्ल्याची बांधणी करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी दाखवलेल्या राजनिष्ठेचं उदाहरण राहुल यांनी कार्यकर्त्यांबरोबरच्या चर्चेदरम्यान दिलं. निष्ठा काय असते यासंदर्भात भाष्य करताना राहुल गांधींनी थेट इंदुलकरांचा उल्लेख केल्याने उपस्थित श्रोते अवाक् झाल्याचं पहायला मिळालं.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असून या यात्रेदरम्यान दिवसभर २५ किलोमीटर अंतर पायी चालल्यानंतर यात्रेकरुन मुक्काम करतात. यामध्ये राहुल गांधींबरोबर ११८ कार्यकर्ते आहेत. जेवणानंतर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली जाते. या चर्चेत राहुल गांधीसुद्धा सहभागी होतात. काही दिवसांपूर्वीच अशाच एका चर्चेत राहुल गांधींनी थेट रायगडाचे उदाहरण दिले. स्वराज्याची राजधानीचं हे स्थान उभारणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी फक्त एका पायरीवर नाव लिहिण्याची परवानगी महाराजांकडे मागितली होती, असा संदर्भ राहुल गांधींनी दिला. अभेद्य असा किल्ला उभारणाऱ्या इंदुलकरांनी किल्ल्याच्या केवळ एका पायरीवर नाव लिहिण्यासाठी मागितलेली ही परवानगी म्हणजे राजनिष्ठेचं उदाहरण असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं होतं.
राहुल गांधी असा चर्चांदरम्यान अनेक गोष्टींबद्दल माहिती देतात असं त्यांच्याबरोबर या यात्रेमध्ये सुरुवातीपासून चालत असलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. मध्यंतरी त्यांनी लिंगायत समाज कपाळावर लावतात त्या विभूतीचं महत्त्व पटवून सांगितलं होतं. स्वामी विवेकानंदांचे सुविचार ते विचारही राहुल गांधी अनेक उदाहरणांमध्ये सांगतात असंही या कार्यकर्त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील एअर बसचा प्रकल्प गुजरातमध्ये अचानक कसा गेला? हे कोणालाही कळले नाही. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्पही गेला. लाखो कोटी रुपयांची गुंतवणूकही गेली व महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिसकावून घेतले, अशी टीका राहुल यांनी बुधवारी नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर एमआयडीसी येथील संध्याकाळच्या सभेत केली. दोन महिन्यांपूर्वी ही पदयात्रा सुरू केली आणि आता महाराष्ट्रात आली आहे. रोज सात आठ तास आपण चालतो. त्यावेळी युवक, महिला, शेतकरी, यांच्या समस्या ऐकून घेतो. मला यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. रस्त्यावरून चालणे व गाडीतून चालणे यात फरक आहे. भारत समजून घ्यायचा असेल तर रस्त्यावर चालले पाहिजे. रस्ते कसे आहेत ते आधी कळते व त्यावरून राज्याची अवस्थाही समजते, असंही राहुल गांधी भाषणात म्हणाले.