काँग्रेसची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटातील नेते राहुल शेवाळे यांनी केली आहे. शेवाळे यांच्या याच मागणीवर काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर त्यांनी जरूर रोखावी. प्रत्येकाने आपापले मत मांडावे. सरकारला ही यात्रा रोखायची असेल, तर त्यांनी तो प्रयत्न करावा, असे राहुल गांधी म्हणाले. ते आज (१७ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ ताब्यात घ्या’, प्रसाद लाड यांच्या मागणीवर फडणवीसांनी केलं भाष्य, म्हणाले “तिथे खासगी…”

“या लढाईला अगोदर समजून घ्यावे लागेल. लोकशाहीत एक पक्ष दुसऱ्या पक्षाशी लढत असतो. या युद्धात देशातील इतर संस्था पारदर्शकता निर्माण करतात. मात्र आता ही लढाई फक्त दोन पक्षांत नाहीये. विरोधकांचे माध्यमांवर नियंत्रण नाही. मात्र भाजपाचे माध्यमांवर नियंत्रण आहे. वेगवेगळ्या संस्थावरही भाजपाचे नियंत्रण आहे. ते न्यायव्यवस्थेवरही दबाव टाकतात. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कमी पडतोय, हे मत चुकीचे आहे. हा वरवरचा समज आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा >>>राहुल गांधीच्या सावरकरांवरील विधानावर तुमची भूमिका काय? उद्धव ठाकरेंनी नेमकं सांगितलं, म्हणाले “ते जे बोलले त्याच्याशी आम्ही…”

“आम्ही माध्यमांसमोर, संसदेत आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त काँग्रेसच नव्हे तर इतर विरोधी पक्षांनीदेखील तो प्रयत्न केला. मात्र आमच्याकडे कोणताही अन्य उपाय शिल्लक न राहिल्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मला देशात सध्या दोन मुख्य समस्या दिसत आहेत. पहिली समस्या म्हणजे सध्या युवकांना रोजगार मिळेल याचा विश्वास नाही. युवकांनी कोठेही शिक्षण घेतलेले असले, तरी त्यांना रोजगार मिळेलच याची शाश्वती नाही. मला नोकरी मिळेल असे ठामपणे सांगणारा एकही तरुण मला भेटलेला नाही,” असेही राहुल गांधी म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

“पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पैसे मोजलेले आहेत. हे पैसे मुख्यत: खासगी संस्थांना दिलेले आहेत. पालक दिवसभर काम करतात. दुसरीकडे महागाई वाढत आहे. असे असतानाच त्यांच्या पाल्यांचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. पालकांना त्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे,” असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.

“दुसरी समस्या शेतकऱ्यांबद्दल आहे. शेतकरी देशाला अन्न पुरवतो. मात्र त्याला सध्या कोणताही अधार नाहीये. त्याच्या शेतमालाला भाव नाहीये. शेतकरी पीकविमा भरतो. मात्र त्याला पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्यांचे कर्जदेखील माफ होताना दिसत नाही,” असा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

“तिसरी अडचण म्हणजे शिक्षणासाठी पैसे मोजावे लागत आहेत. उपचारासाठी पैसे मोजावे लागत आहेत. सरकारी शाळा, कॉलेजेस आता राहिलेले नाहीत. महाराष्ट्रात तर शाळा बंद करण्यात येत आहेत. गॅस सिलिंडरची किंमत वाढली, पेट्रोलचा दर वाढत आहेत. हा पैसा कुठे जात आहे, असे मी शेतकऱ्यांना विचारतो. सर्वांनाच हा पैसा कुठे जातोय, याची माहिती आहे,” असे म्हणत राहुल गांधी यांनी महागाईच्या मुद्द्यावर भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi criticises rahul shewale said try to stop bharat jodo yatra prd