राहुल गांधी यांची प्रचारसभा सुरू होण्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने सभेचा खर्च प्रचारात नोंदविला जाईल, असे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले. सभेला किती माणसे आली होती, किती वाहने केली होती, काय खर्च झाला, याची इत्थंभूत माहिती प्रशासनाकडे आहे. कारण आम्ही सभेवर कॅमेरे लावले होते. त्यामुळे हा संपूर्ण खर्च निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून नोंदविला जाईल.
जिल्ह्य़ात २३ लाख २४ हजार ९७ मतदार असून, नव्याने १ लाख ८४ हजार ६६८ मतदारांची नोंदणी वाढली. दि. २९ मार्चपासून नामनिर्देशन पत्रे मिळू शकतील. दि. ५ एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र भरता येणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी ७ एप्रिलला होईल. २४ एप्रिलला औरंगाबाद जिल्ह्य़ात मतदान होईल. निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये, म्हणून वाहने तपासली जाणार आहेत. या साठी फिरते पथकही स्थापन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आसवनी प्रकल्पांच्या बाहेर हवालदारही नेमले जाणार आहेत. जेणेकरून अवैध दारूची विक्री होणार नाही.
जिल्ह्य़ात ९७.५७ टक्के मतदारांकडे ओळखपत्रे आहेत. नव्याने हेल्पलाइन दूरध्वनीही सुरू केला जाणार असून मतदान केंद्राची माहिती जाणून घेण्यासाठी १९५० क्रमांकावर एसएमएसही करता येऊ शकेल. जिल्ह्य़ात ३ हजार २०० मतदान यंत्रांची गरज आहे. ४ हजार मतदान यंत्रे उपलब्ध असल्याची माहितीही विक्रम कुमार यांनी दिली. वेगवेगळ्या टप्प्यांत मतदान असल्याने पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळेल, असे औरंगाबाद ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी सांगितले.