राहुल गांधी यांच्या नांदेड दौऱ्यात विमानतळावरील दृश्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे नगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे समान पातळीवरचे नेते; पण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या शुक्रवारच्या नांदेड दौऱ्यात विमानतळावरील कक्षात ‘विखे बाहेर तर थोरात आत’ असे दृश्य बघायला मिळाले.

राहुल गांधी यांच्या नांदेड-परभणी दौऱ्यात काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते सहभागी झाले होते. खा.गांधी व पक्षाचे प्रभारी मोहनप्रकाश यांचे सकाळी आगमन होत असताना प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्यासोबत नगर जिल्ह्यातील वरील दोन्ही नेते विमानतळावर हजर होते.

स्वागताची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर खा.गांधी यांनी विमानतळावरील व्हीआयपी कक्षात थोरात यांच्यासह खा.राजीव सातव यांच्याशी १५ मिनिटं चर्चा केली. खा.अशोक चव्हाणही कक्षात हजर होते ; पण विखे पाटील यांना चर्चेदरम्यान बाहेरच ठेवण्यात आल्याची माहिती आज बाहेर आली.

विखे पाटील विधानसभेतील विरोधी पक्षनेते असले तरी अलीकडच्या काळात त्यांची व मुख्यमंत्र्यांची दाट मत्री झाली असल्याने काँग्रेस श्रेष्ठींनी थोरात यांचे पक्षातील महत्त्व वाढवत त्यांना गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवड समितीचे प्रमुखपद बहाल केले आहे. तसेच खा.राजीव सातव, हर्षवर्धन सपकाळ, वर्षां गायकवाड या महाराष्ट्रातील तरुण नेत्यांवरही मोठी जबाबदारी टाकण्यात आली असून खा.गांधी यांनी नांदेडमध्ये थोरात यांच्याशी गुजरातच्या विषयावर चर्चा केली.

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आपल्याला निमंत्रण नव्हते म्हणून नांदेडला गेलो नाही, असा खुलासा शुक्रवारीच केला होता. त्यांची गेल्या काही दिवसांतील कार्यशैली, त्यांची वक्तव्ये व त्यांचा कल लक्षात घेऊन काँग्रेस श्रेष्ठींनी राणे यांना महत्त्व द्यायचे नाही, असे ठरविले असल्याचे खा.गांधी यांच्या निकटवर्तीयाने ‘लोकसत्ता’ ला सांगितले. राणे यांनी पक्षनेतृत्वाकडे प्रदेशाध्यक्षपद मागितले होते ; पण नेतृत्वाला त्यांची ही मागणी मान्य नाही.

परभणी येथील कार्यक्रम आटोपून दिल्लीला जाण्यासाठी खा.गांधी यांचे शुक्रवारी सायंकाळनंतर नांदेड विमानतळावर आगमन झाले, त्या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, आ.डी.पी.सावंत यांच्याशी त्यांनी अनौपचारिक चर्चा केली. तत्पूर्वी नांदेडमधील मेळाव्यासाठी खा.गांधी यांचे सभास्थानी आगमन झाल्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांचीही त्यांनी विचारपूस केली, पण व्यासपीठावर विराजमान असलेले ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना खा.गांधी यांच्यासमोर जाऊन आपली ओळख सांगावी लागली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi ignore radhakrishna vikhe patil in nanded tour
Show comments