काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अपरिपक्व असल्याने २०१४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्यांचा प्रभाव पडणार नाही. पुढील लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसप्रणीत यूपीएची सत्ता येणार नसून भाजपप्रणीत एनडीएचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला. भाजपलाही संपूर्ण बहुमत मिळणार नसल्याने अन्य राजकीय पक्षांशी त्यांना जुळवून घ्यावे लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
रिपाइ आठवले गटाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष व साहित्यिक डॉ. ज्योती लांजेवार यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी आठवले शनिवारी नागपुरात आले होते. यानिमित्त रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.‘निवडणूकपूर्व चाचण्यांचे सर्व निकाल काँग्रेसच्या विरोधात जात आहेत. त्यामुळे काँग्रेसने या निवडणूक चाचण्यांवर बंदीची मागणी केली आहे.
ही मागणी म्हणजे प्रसिद्धी व प्रसार माध्यमांच्या विचार स्वातंत्र्यावर गदा आहे. काँग्रेसने देशातील मुस्लिमांचा विश्वास गमावला असून, ते भाजपकडे वळत आहेत, तेव्हा भाजपनेही त्यांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना आश्वस्त केले पाहिजे. तसेच त्यांच्या लोकसंख्या वाढीचा मुद्दा गुंडाळून ठेवला पाहिजे,’ असे आठवले यांनी सांगितले.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पुढे आणल्यामुळे काही छोटे राजकीय पक्ष दूर जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविषयी मुस्लिमांच्या मनात राग आहे, तेव्हा भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदासाठी अन्य नेत्याचे नाव पुढे करावे. भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी, बिजू पटनायक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाही एनडीएमध्ये सामावून घ्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर रिपाइ गटाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या तीन जागा व राज्यसभेची एक जागा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. परंतु, या जागा कोणाच्या कोटय़ातून दिल्या जातील, याची आपणाला कल्पना नाही. शिवसेना आणि भाजपला सत्ता प्राप्त करावयाची असेल तर रिपब्लिकन पक्षाला बरोबर घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुस्लिम आणि दलितांची मते मिळविण्यासाठी भाजप-सेनेने वादाचे मुद्दे दूर ठेवावेत. मनसेचे नेते राज ठाकरे महायुतीत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. त्यामुळे मतांची विभागणी टळेल. त्याचा फायदा महायुतीलाच होईल. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपले मतभेद दूर करावेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा शिवसेनेत जावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
येत्या ३० नोव्हेंबरला कस्तूरचंद पार्कवर पक्षातर्फे संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यास भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी ठाणे येथे २३ नोव्हेंबरला आयोजित संकल्प मेळाव्यात विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित राहतील. २४ नोव्हेंबरला कोल्हापूर येथे होणाऱ्या संकल्प मेळाव्यात गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे सुभाष देसाई उपस्थित राहणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा