राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यात आली. ही बैठक पूर्ण होताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी पवार यांच्या दिल्लील्या ‘६ जनपथ’ या निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संकटात असताना राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन या संकटकाळात काँग्रेस पक्ष तुमच्याबरोबर असल्याचं सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली ते त्यांनी सांगितलं. सोनिया दुहान म्हणाल्या, राहुल गांधी यांनी शरद पवार यांना सांगितलं आहे की, त्यांचा १०० टक्के पाठिंबा आहे. या काळात संपूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्याबरोबर आहे. तसेच सर्व विरोधी पक्ष तुमच्याबरोबर असतील.
हे ही वाचा >> “ठाकरे गट-मनसे युतीचा प्रस्ताव आला तर…”, संदीप देशपांडे यांचं वक्तव्य; म्हणाले, “तुमच्या वाईट परिस्थितीत…”
पवार-गांधी भेटीत काय चर्चा झाली असा प्रश्न विचारल्यावर सोनिया दुहान म्हणाल्या, सध्या देशातली जी परिस्थिती आहे, ईडी (अंमलबजावणी संचालनालय), सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग), आयटीची (आयकर विभाग) भिती दाखवून आणि पैशांचं अमिष दाखवून पक्ष फोडले जात आहेत. आमदार, खासदार फोडले जात आहेत. हे वाईट राजकारण सुरू आहे. याविरोधात आक्रमक होण्याची गरज आहे. त्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. सध्याची देशातली राजकीय परिस्थिती लोकशाहीसाठी चांगली नाही.