Rahul Gandhi On Vinod Tawde : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, ऐन मतदानाच्या एक दिवस आधी विरारमध्ये काही मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांनी केला. या नंतर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. जवळपास तीन ते चार तास हा संपूर्ण गोंधळ सुरु होता. तर विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.
यानंतर आता विरोधकांकडून भाजपावर टीका करण्यात येत आहे. यातच काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी विनोद तावडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, हे पाच कोटी रुपये कोणाच्या तिजोरीतून आणले?”, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.
राहुल गांधी यांनी काय म्हटलं?
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, हे ५ कोटी रुपये कोणाच्या तिजोरीतून बाहेर आले? जनतेचा पैसा लुटून तुम्हाला टेम्पोमध्ये कोणी पाठवले?”, असा सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
मोदी जी, यह 5 करोड़ किसके SAFE से निकला है? जनता का पैसा लूटकर आपको किसने Tempo में भेजा? https://t.co/Dl1CzndVvl
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 19, 2024
रमेश चेन्नीथला काय म्हणाले?
“महाराष्ट्रात भाजपाने पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांनी पैसे वाटायला सुरुवात केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे ५ कोटी रुपये घेऊन एका मतदारसंघात जाऊन ते वाटत असल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपाने कितीही पैसे वाटले तरी महाराष्ट्रात भाजपा महायुती विजयी होणार नाही. महाराष्ट्रातील जनता सत्ता परिवर्तनासाठी तयार आहे. विनोद तावडे यांनी जे काम केलं. त्यासाठी त्यांना अटक केली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्यांनी ज्यांना ज्यांना पैसे वाटले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाजपा आणि शिवसेना शिंदे यांनी राज्यात पैसे वाटले याची चौकशी झाली पाहिजे”, असं काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे.
The BJP National Secretary himself distributing cash for votes, show their desperation. The Mahayuti & BJP is scrambling in front of a sure defeat and the people of Maharashtra will make sure the corrupt Government is voted out of power. pic.twitter.com/VllgKC8VWC
— Ramesh Chennithala (@chennithala) November 19, 2024
काँग्रेसने काय म्हटलं?
“भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडण्यात आलं. विनोद तावडे हे एका पिशवीत पैसे घेऊन तेथील लोकांना बोलावून पैसे वाटत होते. ही बाब जनतेला समजताच मोठा गोंधळ उडाला. विनोद तावडेंचे पैसे घेऊन अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. महाराष्ट्रात मतदान होण्याआधीच भाजपाचे नेते पैशाच्या जोरावर निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी”, असं काँग्रेसने म्हटलं आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या अधिकृत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून एक व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे.