Rahul Gandhi on Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत दिसणारा कल विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे बदलल्याची प्रतिक्रिया या निकालांवर व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावेही केले गेले. या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप राज्यातील विरोधी पक्षांकडून अर्थात महाविकास आघाडीकडून करण्यात येत होते. आज लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत सविस्तर आकडेवारी देऊन तीन महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आयोगाला केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी…

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच राहुल गांधींनी ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त बदलण्याची प्रक्रियाच बदलल्याचा मुद्दा उपस्थित केला. “निवडणूक आयोगाचे आयुक्त एका समितीकडून नेमले जात होते. त्यात सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान होते. त्यात सरकारकडून बदल करण्यात आला. सरन्यायाधीशांना त्यातून बाहेर काढण्यात आलं आणि एका भाजपा व्यक्तीला त्या समितीत दाखल करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयुक्तांना हटवण्यात आलं आणि नव्या आयुक्तांना तिथे नेमण्यात आलं”, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी उपस्थित केले तीन मुद्दे…

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी गैरप्रकार केल्याचा दावा करताना राहुल गांधींनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत.

१. “विधानसभा निवडणूक २०१९ ते लोकसभा निवडणूक २०२४ या पाच वर्षांत ३२ लाख मतदारांचा याद्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला. पण लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांत ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांत समाविष्ट झालेले मतदार आधीच्या पाच वर्षांतल्या मतदारांपेक्षा जास्त कसे? हे ३९ लाख मतदार कोण आहेत? आख्ख्या हिमाचल प्रदेशमध्ये ३९ लाख मतदार आहेत. आणि तेवढे नवे मतदार महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्या समाविष्ट झाले आहेत”, असा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला.

२. “महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही महाराष्ट्रातील एकूण नोंदणीकृत मतदार जास्त कसे होतात? सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९.५४ कोटी आहे. पण निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रात त्याहून जास्त म्हणजे ९.७ कोटी मतदार आहेत. लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अचानक हे मतदार तयार करण्यात आले आहेत”, असा दावा राहुल गांधींनी केला.

३. “महाराष्ट्रात विरोधी पक्षांना जितक्या मतदारांनी मतदान केलं त्यांची संख्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अजिबात कमी झालेली नाही. काँग्रेसला लोकसभेत कामठी विधानसभा मतदारसंघात १.३६ लाख मतं मिळाली. विधानसभेत आम्हाला तिथेच १.३४ लाख मतं मिळाली. यात फारसा फरक पडलेला नाही. पण या काळात या मतदारसंघात ३५ हजार नव्या मतदारांचा समावेश झाला आहे. दुसरीकडे भाजपाला लोकसभेत १.९ लाख मतं मिळाली होती. विधानसभेत त्यांना १.७५ लाख मतं मिळाली. यातले बहुतेक मतदार हे त्या नव्याने समाविष्ट झालेल्या ३५ हजार मतदारांमधून आले. हे फक्त एका मतदारसंघातलं नाहीये. हे अनेक मतदारसंघांमध्ये दिसतंय. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मतदारसंघांमध्ये हे दिसून आलं आहे”, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. महाराष्ट्रात आमची मतं कमी झालेली नाहीयेत, भाजपाची वाढली आहेत.

राहुल गांधींची निवडणूक आयोगाकडे मागणी

यावेळी राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे मतदार याद्या देण्याची मागणी केली आहे. “आम्ही निवडणूक आयोगाला हे सांगत आलोय. आम्हाला राज्यातल्या मतदारयाद्या हव्यात. त्यात मतदारांची नावं, पत्ते आणि फोटो हवेत. आम्हाला लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्या हव्यात. आम्हाला हे पाहाचंय की हे नवे मतदार कोण आहेत? अनेक मतदारांची नावं हटवण्यात आली. अनेक मतदारांची नावं एका बुथमधून दुसऱ्या बुथमध्ये समाविष्ट करण्यात आली. यातले बहुतेक मतदार हे दलित, आदिवासी, अल्पसंख्याक गटातले होते. आम्हाला हे समजून घ्यायचं आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.

“आम्ही यासाठी निवडणूक आयोगाला वारंवार विनंती केली आहे. पण त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही. यात काहीतरी काळंबेरं आहे म्हणून ते उत्तर देत नाहीयेत. मी कोणताही आरोप करत नाहीये, मी इथे डेटा दाखवतोय”, असंही राहुल गांधींनी यावेळी नमूद केलं.