निवडणुकीत आश्वासने देणे सोपे असते. लोकसभेत नरेंद्र मोदी यांनी मोठ-मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. मात्र, दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला. आम्ही जे बोलतो तेच करतो. त्यामुळे राज्यातील जनतेने पुन्हा काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवावी, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.
काँग्रेसतर्फे औसा येथे आयोजित प्रचारसभेत गांधी बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहनप्रकाश, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, मधुकरराव चव्हाण, अमित देशमुख, बसवराज पाटील, अॅड. व्यंकट बेद्रे आदी उपस्थित होते. आपण पंतप्रधान झालो, तर पाकिस्तान व चीनला धडा शिकवू, असे मोदी यांनी निवडणुकीपूर्वी सांगितले होते. ते पंतप्रधान झाले. चीनच्या अध्यक्षांसोबत झोक्यावर बसून चर्चा सुरू असताना लडाखमध्ये चिनी सनिकांनी आक्रमण केले. त्यावर मोदी काही बोलले नाहीत. पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे, त्यावरही मोदी काही बोलत नाहीत. बोलणे सोपे असते, करणे अवघड असते हे आता त्यांना कळत असेल.
केंद्रात यूपीएचे सरकार असताना आम्ही गरिबांसाठी योजना राबविल्या. मनरेगा, अन्न सुरक्षा, शिक्षण अधिकार, जमीन अधिग्रहण कायद्यातील बदल अशा अनेक योजना राबविल्या. मात्र, गेल्या ४ महिन्यांत मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते गरिबांच्या मुळावरच उठले आहेत. हळूहळू त्यांनी जमीन अधिग्रहण कायद्यात बदल करण्यास सुरुवात केली. राजीव गांधी आरोग्यदायी योजनेंतर्गत गरिबांसाठी मोफत उपचार केले जातात. औषधे मोफत दिली जातात. मोदी अमेरिकेत गेले व त्यांनी औषधावरील र्निबध उठवल्यामुळे औषधे महाग झाली. आठ हजार रुपयांचे कर्करोगावरील औषध १ लाख रुपयांना विकले जात आहे. श्रीमंत उपचार घेतील. गरिबांनी उपचार कसा घ्यायचा? असा सवालही गांधी यांनी उपस्थित केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रामाणिक आहेत. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य गुजरातपेक्षा पुढे आहे, हे आकडेवारी सांगते. आमचे मुख्यमंत्री मार्केटिंग करीत नाहीत. गुजरात मॉडेलचे मार्केटिंग करीत खोटी माहिती लोकांना सांगितली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
विलासरावांची आठवण!
लोकसभेच्या प्रचारास राहुल गांधी आले होते, तेव्हा त्यांनी विलासरावांची आठवण काढली नव्हती. विधानसभेच्या प्रचारात मात्र त्यांनी आवर्जून विलासरावांची आठवण काढली. शिवराज पाटील चाकूरकर प्रचारात नाहीत. त्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची जबाबदारी मोठी असल्याची आठवणही त्यांनी उपस्थितांना करून दिली.
राहुल गांधी म्हणाले
– महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास राज्यातील ३० लाख युवकांना रोजगार.
– लोकोपयोगी औद्योगिक धोरण घेणार.
– गरिबांना घरासाठी अडीच लाख रुपये. शेतकऱ्यांना २४ तास वीज.
– गरिबांना उपचारासाठी अडीच लाखांपर्यंत मदत, मोफत औषधे.
– महाराष्ट्राची प्रगती, विकास व तरुणांना रोजगार.
‘बोलल्याप्रमाणे चालणाऱ्या काँग्रेसलाच पुन्हा सत्ता द्या’
निवडणुकीत आश्वासने देणे सोपे असते. लोकसभेत नरेंद्र मोदी यांनी मोठ-मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. मात्र, दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला. आम्ही जे बोलतो तेच करतो.
First published on: 09-10-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi rally in latur