Rahul Gandhi In Parbhani : परभणी जिल्ह्यात १० डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर परभणीत हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले होते. हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप करत मारहाणीमुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू संदर्भात विधानसभेत स्पष्टीकरण दिलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, आज काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. “पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली आहे”, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. तसेच “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली”, असा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केला आहे.

हेही वाचा : Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”

राहुल गांधी काय म्हणाले?

“सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबीयांची आताच मी भेट घेतली. तसेच ज्या-ज्या लोकांना मारहण झाली, त्यांच्याशी मी बोललो आहे. सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबीयांनी मला शवविच्छेदनाचा रिपोर्ट दाखवला. तसेच काही फोटो आणि व्हिडीओ देखील दाखवले. सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू हा कोठडीत झालेला आहे. पोलिसांनी सोमनाथ सुर्यवंशीची हत्या केली. मात्र, या घटनेची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत खोटं बोलले. सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे म्हणून मारलं गेलं. सोमनाथ सूर्यवंशी संविधानाचं रक्षण करत होता. ‘आरएसएस’ची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची विचारधारा आहे. आमची मागणी आहे की या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. या घटनेत कोणतंही राजकारण होत नाही. न्याय मिळायला हवा”, असं म्हणत राहुल गांधींनी गंभीर आरोप केले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi serious accusation of somnath suryavanshi death in police custody and parbhani violence gkt