कोणत्याही सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची असायला हवी, पण केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांचे दु:ख पाहून मनाला वेदना होत आहेत. शेतकऱ्यांसाठी लढण्यास आम्ही सज्ज आहोत. त्यांना न्याय मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील टोंगलाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केले.
सध्याचे सरकार हे निवडक भांडवलदारांचे सरकार आहे. गरिबांविषयी, मजुरांविषयी या सरकारला कोणतीही आत्मीयता नाही, असा आरोप त्यांनी केला. शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील ही आपली पदयात्रा राजकीय कारणांसाठी नव्हे, तर तथ्य जाणून घेण्यासाठी होती, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. संसदेत कृषिमंत्री महाराष्ट्रात केवळ तीनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, असे निवेदन देतात. इकडे शेकडो आत्महत्या होत असताना हरयाणाचे एक मंत्री शेतकऱ्यांना घाबरट संबोधतात. हा प्रकार संवेदनाशून्यतेचा आहे. सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून आपल्याला दु:ख होत आहे, असे ते म्हणाले.
या भागात आपण फिरलो, लोकांशी चर्चा केली तेव्हा शेतकऱ्यांचे तीन मुख्य प्रश्न असल्याचे आपल्या लक्षात आले. सर्वात मोठा विषय कर्जाचा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी. कर्जामुळेच सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. दुसरा विषय हा किमान आधारभूत किमतीचा आहे. पंजाबमध्येही याच संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. सरकार शेतमालाला योग्य भाव देत नाही आणि आधारभूत किंमत वाढवून मिळालेली नाही, ही समस्या आहे. महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळत होता, पण तो आता मिळत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
आपण शेतकऱ्यांना कोणतेही आश्वासन दिलेले नाही, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, मी आश्वासन काय देऊ शकतो, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. काँग्रेस पक्ष म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करीतच आहोत, पण त्याला मर्यादा आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची तयारी आम्ही केली आहे. शेतकऱ्यांनी धर्य ठेवावे, खचून जाऊ नये. आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, हेच सांगण्यासाठी आपण या भागात पदयात्रा केल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader