Rahul Gandhi to Unveil Chhatrapati Shivaji Maharaj Statue : काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा खासदार राहुल गांधी येत्या शुक्रवारी व शनिवारी (४ व ५ ऑक्टोबर रोजी) कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरमधील कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी दिली.
खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा होणार आहे. ५ ऑक्टोबर रोजी खासदार राहुल गांधी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहतील, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.
हे ही वाचा >> Sharad Pawar : शरद पवारांची अजित पवारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव, घड्याळ चिन्हाबाबत केली ‘ही’ मागणी
‘असा’ असेल राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा
४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन आणि कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी कार्यक्रम स्थळी कडे प्रस्थान, प्रवासाचा मार्ग : कोल्हापूर विमानतळ – शाहू नाका – शिवाजी विद्यापीठ – कावळा नाका – धैर्यप्रसाद चौक – पोलीस उपअधीक्षकांचं कार्याल – भगवा चौक, कसबा बावडा. सायंकाळी ६ वाजता – कसबा बावडा येथील समारंभ संपल्यानंतर हॉटेल सयाजीकडे प्रयाण आणि मुक्काम
५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता – हॉटेल सयाजी येथून राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाकडे प्रस्थान, प्रवासाचा मार्ग : हॉटेल सयाजी – कावळा नाका – दाभोळकर कॉर्नर – व्हिनस कॉर्नर – दसरा चौक – राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ. दुपारी १.३० वाजता – राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे आगमन व अभिवादन, त्यानंतर संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज पॅव्हेलियन, हॉटेल सयाजी, कोल्हापूर. सायंकाळी ४ वाजता – हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण असा त्यांचा दौरा कार्यक्रम असेल अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.