संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात विदर्भातील कलावतीच्या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी टिपे गाळलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे मंगळवारी झेड प्लस सुरक्षेत विदर्भात पंचतारांकित बैठकीपुरते येत असल्याने त्यांच्या या दौऱ्याला अतिवृष्टीने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या नाराजीचे ग्रहण लागले आहे.
राहुल गांधी मंगळवारी, सकाळी नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर थेट अमरावती मार्गावरील पंचतारांकित सुराबर्डी मिडोजमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून बुधवारी पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. पक्षसंघटनेच्या बळकटीकरणावर पदाधिकाऱ्यांशी चर्चा एवढाच दिवसभराच्या या दौऱ्याचा अजेंडा आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नंतर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार विदर्भातील पूरग्रस्तांना भेटून गेले. तीन महिन्यांतील अतिपावसाने शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिक प्रचंड आर्थिक संकटात असताना राहुल गांधी यांना शेतकऱ्ऱ्यांच्या भेटीसाठी वेळच नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विदर्भात लोकसभेच्या १० आणि विधानसभेच्या ६२ जागा असून आगामी निवडणुका जवळ असल्याने काँग्रेसची विदर्भातील राजकीय ताकद अजमावण्याच्या दृष्टीने राहुल गांधी पदाधिकाऱ्यांबरोबर दिवसभर मंथन करणार असून यातून निवडणूक रणनीतीची आखणी केली जाणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी तसेच निवडक पदाधिकाऱ्यांनाच बैठकीत प्रवेश दिला जाणार असल्याने सामान्य कार्यकर्त्यांचीही निराशा झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जातीने राहुल गांधींच्या स्वागतासाठी नागपुरात येत आहेत.

Story img Loader