राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला आहे. एकूण १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. तर महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे यात्रेचे आगामन होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या मोठय़ा सभा घेण्याचे प्रदेश काँग्रेसचे नियोजन आहे. तर, भाजपाने राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधला आहे. ही यात्रा महाराष्ट्रात चार जिल्ह्यातच गुंडाळली जाणार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.

यासंदर्भात भाजपाने ट्वीटद्वारे म्हटलं आहे की “राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात ४ जिल्ह्यातच गुंडाळली जाणार! केरळ सारख्या लहानश्या राज्यात तब्बल २० दिवस थांबून राज्यभर दौरा करणाऱ्या राहुल गांधींनी महाराष्ट्रात मात्र ‘भारत जोडो’ यात्रा फक्त ४ जिल्ह्यातून करायचं ठरवलं आहे.”

याशिवाय “राहुल गांधीना खात्री झाली आहे की, महाराष्ट्रात त्यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे ३६ पैकी फक्त ४ जिल्ह्यात ते ‘भारत जोडो’ यात्रा करणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कायम गरळ ओकणाऱ्या राहुल गांधीना महाराष्ट्रातील जनता नक्कीच अद्दल घडवेल.” असंही भाजपाने म्हटलं आहे.

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…

तर दुसरीकडे राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपची विचारधारा मान्य नसणारे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरी संघटना यांनी देशाची अखंडता अबाधित राहावी, यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या नेत्यांनी केले.

कन्याकुमारीमधून पदयात्रेला सुरुवात करून त्याचा काश्मीरमध्ये समारोप करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात राहुल गांधी यांचा १६ दिवस मुक्काम असणार आहे. या दरम्यान ३८३ कि. मी. पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष जितू पटवारी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली होती.