आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ बांधणी वेगात सुरू आहे. जागा वाटपही अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत रंगणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाल्यानंतरची सर्वांत मोठी ही निवडणूक असल्याने अटीतटीची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, भायखळा लोकसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांचं नाव पुढे आल्याची चर्चा आहे. विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उतरण्याची शक्यता आहे. या चर्चांवर राहुल नार्वेकरांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहा विधानसभा मतदारसंघाचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या भायखळा येथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. या मतदारसंघात मराठी आणि मुस्लिमबहुल वस्ती सर्वाधिक आहे. मिलिंद देवराही या जागेवरून इच्छुक होते. परंतु, विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यामुळे मिलिंद देवरा यांना येथे तिकिट मिळण्याची शक्यता फार कमी होती. त्यामुळे त्यांनी शिंदे गटाची वाट धरत राज्यसभेवर उमेदवारी मिळवली. त्यामुळे आता भाजपाकडून या जागेसाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. आमदार अपात्रप्रकरणात राहुल नार्वेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे यंदा राहुल नार्वेकर दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज ते वरळीत गेले होते. वरळीतील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी संवाद साधला.

वरळीतील लोकांना भाजपाच्या निमित्ताने आशेचा किरण दिसतोय

“मी लोकसभेच्या तयारी साठी येथे आलो नाही. एनडीए ज्याला उमेदवारी देईल त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू. त्या तयारीसाठी काही वेळ आहे. आज इथं येण्याचं तात्पर्य असं आहे की वरळीत तीन लोकप्रतिनिधी असूनही काहीच काम होत नाही. झोपडपट्यांचा विकास होत नाही, कोळीवाड्यांच्या सीमांकनांचा प्रश्न आहे. असे असताना लोकांची निराशा झाली आहे, त्यांना भाजपाच्या निमित्ताने आशेचा किरण दिसत आहे”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

मुंबईकरांच्या प्रेमामुळे मला सर्वोच्च पद भूषवायची संधी मिळाली

“मुंबईकरांच्या प्रेमामुळे मला विधानसभेतील सर्वोच्च पद भूषवायची संधी मिळाली आहे, त्यामुळे वरळीकरांच्या उपयोगात येऊ शकलो, त्यांचं काही कार्य करू शकलो तर या विश्वासाची परतफेड होईल. म्हणूनच मी वरळीत येऊन सहाच्या सहा विभागीय कार्यालयात जाऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेन”, असंही राहुल नार्वेकर म्हणाले.

वरळी कोणाचाही बालेकिल्ला नाही

“वरळी हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. जो काम करेल त्याचा तो बालेकिल्ला होईल. येथील लोकप्रतिनिधींनी कामं केली असती तर आम्हाला यायची वेळ आली नसती. लोक आता भावनिक होऊन तुमच्यापाठी येणार नाहीच. तुम्ही लोकांची कामं केली तर ते तुम्हाला डोक्यावर उचलतील नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवतील. लोकांना विकास हवाय, कामं झालेली दिसली पाहिजेत. चांगले व्यायामशाळा, मैदाने पाहिजेत, झोपडपट्ट्यांचा विकास पाहिजे. त्यांची कामे केली तर लोक डोक्यावर उचलू ठेवतील मग तुम्ही बोलू शकतील की हा तुमचा बालेकिल्ला आहे”, असं म्हणत राहुल नार्वेकरांनी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

“मी राज्यात काम करायचं की केंद्रात याबाबतचा आदेश मला पक्षाकडून येईल. पक्षसंघटनेत काम करायचं असेल तरीही मी करेन. परंतु, पक्ष जो आदेश देईल, त्याचा सन्मान केला जाईल”, असंही राहुल नार्वेकरांनी पुढे स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul narvekar will now go to the lok sabha the position clarified by the candidature of mp sgk