आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणारे राहुल नार्वेकर यांच्यावर आता एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्या दहाव्या परिशिष्ठाचा राहुल नार्वेकरांनी या दोन्ही प्रकरणांमध्ये वारंवार आधार घेतला आहे, त्या परिशिष्ठाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानभवनात झालेल्या ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदेमध्ये ही घोषणा केली. दरम्यान यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. या टीकेवर राहुल नार्वेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदेमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. दहाव्या परिष्ठिनुसार सर्वच विधानसभेत विषय येतात आणि त्यावर सुनावणी घेतली जाते. त्यामुळे दहाव्या परिशिष्ठावर अधिक स्पष्टता आणणं आवश्यक आहे. देशातील सर्वच विधानसभा अध्यक्षांनी विचारविनिमय करून समिती गठीत केली आहे. त्या समितीने या विषयांचा अभ्यास करून १० व्या परिशिष्ठात सुधार आणता येईल, याकरता या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशीनुसार शासनाकडे अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर त्यावर कार्यवाही केला जाईल, अशी माहिती राहुल नार्वेकरांनी दिली.
दरम्यान, या नियुक्तीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह जितेंद्र आव्हाड आणि इतर विरोधातील नेत्यांनी टीका केली आहे. १० वेळा पक्षांतर केलेल्या व्यक्तीला पक्षांतर बंदी कायद्या समितीवर बसवणं म्हणजे हा संविधानाचा अपमान असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. त्यावर राहुल नार्वेकर म्हणाले, “उद्धव ठाकरेंचं माझ्यावरचं प्रेम जगजाहीर आहे. त्यावर मी काही बोलू इच्छित नाही. आपल्या राज्यातील आपल्या सहकाऱ्याला अखिल भारतीय समितीची जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर राज्यासाठी तो गौरवशाली क्षण असतो. अशावेळी ठाकरेंनी शुभेच्छा देऊन विश्वास दर्शवण्यापेक्षा अशी टीका करणे म्हणजे आपल्या राज्याबद्दल आणि आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाही हे स्पष्ट होत आहे. “
“माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कामाविषयी बोलण्याची धमक ठेवा. मी जो निर्णय दिला, त्या निर्णयाविरोधात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवून देण्याची धमक उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये धमक नाही”, असंही ते म्हणाले.