शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वरळी (मुंबई) येथे महापत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेच्या घटनेचे पुरावे सादर केले. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निकाल देताना म्हटलं होतं, “शिवसेनेची घटना उपलब्ध नव्हती. तसेच त्यांच्या पक्षात प्रमुखपदाची निवड झाल्याचे पुरावे नाहीत.” त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत गेल्या काही वर्षांमध्ये पक्षाने घेतलेले निर्णय आणि ठरावांचे दस्तावेज दाखवले. पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकीचा व्हिडीओदेखील दाखवला. अॅड. अनिल परब आणि खासदार संजय राऊत यांची भाषणं झाली. तसेच अॅड. असीम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचं आणि शिवसेनेकडे असलेल्या पुराव्यांचं विश्लेषण केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, मागच्या आठवड्यात लबाडाने जो निकाल दिला. नाही नाही लवादाने जो निकाल दिला त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. आता सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहेत. तसेच आता जनतेच्या न्यायालयात आम्ही आलो आहोत. राहुल नार्वेकर आणि मिंध्यांनी माझ्यासमोर उभं रहावं आणि सांगावं शिवसेना कुणाची. पोलीस संरक्षण न घेता जाहीर करा. मग कुणाला पुरावा, गाडावा आणि तुडवावा ते जनता ठरवेल.
दरम्यान, ठाकरे गटाच्या या पत्रकार परिषदेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलं आहे. नार्वेकर म्हणाले, शिवसेनेच्या उबाठा गटाने आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं पत्रकार परिषद घेणार, पण यांनी तर छोटा दसरा मेळावाच घेतला. त्याला गल्लीबोळातली भाषणांची मालिका म्हणावं लागेल. खरंतर माझी अपेक्षा होती की या पत्रकार परिषदेतून किंवा या मेळाव्यातून माझ्याकडून काही घटनाबाह्य झालंय का ते दाखवलं जाईल. कदाचित माझ्याकडून काही चुकीचं कृत्य किंवा माझ्या निर्णयात काहीतरी चुकीचं झालं होतं का? घटनाबाह्य झालेलं का? नियमबाह्य झालेलं का? असं काहीतरी दाखवलं जाईल. परंतु, तिथे केवळ राजकीय भाषणं झाली. तसेच केवळ संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरले गेले, शिविगाळ केली गेली. याव्यतिरिक्त काहीच झालं नाही.
हे ही वाचा >> उद्धव ठाकरे आक्रमक! “एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकरांना माझं खुलं आव्हान आहे मैदानात सुरक्षा न घेता या आणि…”
राहुल नार्वेकर म्हणाले, पत्रकार परिषदेत ते (ठाकरे गट) राज्यपालांना फालतू माणूस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाबद्दल अपशब्द वापरले, विधानसभा अध्यक्षांवरचं त्यांचं प्रेमही दिसलं. निवडणूक आयोगाला चोर म्हणाले, हे सगळं दुर्दैवी आहे. कुठलाही आधार असो अथवा नसो, संविधानिक संस्थांविषयी असे शब्दप्रयोग करणं लोकशाहीसाठी घातक आहे. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष अशा कोणत्याही संवैधानिक पदावर, संस्थेवर यांचा विश्वास नाही.