सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी शिवसेनेच्या सत्तासंघर्षावरील निकाल दिला होता. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असं न्यायालयाने निकालात म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. यावरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावलं आहे. पुढील एका आठवड्याच्या आत विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीला सुरुवात करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाच्या या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “न्यायालयाने दिलेल्या निर्देशासंदर्भात अद्याप माझ्यापर्यंत कोणतीही माहिती आली नाही. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीबाबत मी संपूर्ण माहिती घेईन. त्यानंतर पुढची कारवाई काय असेल? याबद्दल निर्णय घेईन”, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाविरुद्ध निर्णय देऊ शकतं”, शिवसेना सत्तासंघर्षावर वकिलाचं मोठं भाष्य
“मला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत अद्याप मिळाली नाही. जेव्हा मला ही प्रत मिळेल, तेव्हा मी याविषयी पूर्ण माहिती घेईन. त्यानंतर उचित निर्णय घेईन. कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण केली जाईल. यामध्ये कसलीही दिरंगाई केली जाणार नाही. पण कोणत्याही प्रकारची घाईही केली जाणार नाही. ज्यामुळे एखाद्या पक्षावर अन्याय होईल,” असंही नार्वेकर म्हणाले.
हेही वाचा- सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाचे निर्देश; म्हणाले, “एका आठवड्याच्या आत…”
सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिले?
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटलं, “हे न्यायालय विधानसभा अध्यक्षांचं आदर करतं, पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रतिष्ठा राखली जावी, अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही निर्देश देतो की विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची सुनावणी करावी.”