विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणाचा निकाल १० जानेवारी रोजी जाहीर करतील. शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटातील आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह पक्ष सोडून भाजपाबरोबर गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवावं, अशी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. गेल्या सत-आठ महिन्यांत राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. आता ते याप्रकरणाचा निकाल देणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, या निकालाबाबत शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून परस्परविरोधी प्रतिक्रिया आणि दावे समोर येत आहेत. आमदार अपात्रतेचा निकाल लागण्यापूर्वीच राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रतिक्रियेमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचीत केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निकाल त्यांच्या गटाच्या बाजूने लागेल असा अंदाज वर्तवला. एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभा आणि लोकसभेतही बहुमत आमच्याकडे आहे. मेरिटचा विचार केल्यास निकाल आमच्या बाजूने लागायला हवा.

दरम्यान, यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. नार्वेकर म्हणाले, शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. यासंदर्भात उलेली कार्यवाही आम्हाला पूर्ण करायची आहे. ती पूर्ण करून उद्या निकाल द्यायचा प्रयत्न करू. हे निकालपत्र ५०० पानांचं आहे. याप्रकरणी एकूण ३४ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. दोन ते सव्वादोन लाख पान चाळावी लागली. त्यामुळे निकालास इतका वेळ लागणारच होता.

हे ही वाचा >> मुख्यमंत्री शिंदे अन् अध्यक्ष नार्वेकर भेटीवर उल्हास बापटांची टीका; म्हणाले, “हे म्हणजे…”

राहुल नार्वेकर राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर काय म्हणाले?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचं प्रकरणही विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. यावरही राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं. नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर ३० जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्या याचिका प्रलंबित आहेत. त्यावर वेळेत निकाल देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul narwekar on shivsena mla disqualification will try to give verdict by january 10 asc