Rahul Narwekar on Maharashtra Assembly Opposition Leader : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. तीनही पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्यानंतर आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून या पक्षांमध्ये रस्सीखेच चालू असल्याचं चित्र समोर आलं आहे. मविआमधील तीन पक्षांना मिळून एकूण २८८ पैकी केवळ ४६ जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ (२९ आमदार) एकाही पक्षाकडे नाही. शिवसेना (ठाकरे) पक्षाला २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला केवळ १० जागा जिंकता आल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी २८८ पैकी १० टक्के म्हणजेच किमान २९ जागा असण्याची आवश्यकता आहे. मात्र, पुरेसे संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, अशी चर्चा असताना आता तीनही पक्षांची हे पद मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याबाबत विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल नार्वेकर म्हणाले, “विरोधी पक्षांमधील आमदारांची संख्या कमी दिसून येत असली तरी देखील त्यांच्यावर अन्याय होणार नाही. सत्तारुढ बाकावर २३७ आमदार आहेत. तर, विरोधी बाकावर ५० सदस्य असून त्यांची संख्या कमी असली तरी मी त्यांना वारंवार बोलण्याची संधी देईन. त्यांचे विचार, त्यांची मतं प्रकट करण्याची संधी दिली जाईल. मी आधीच याची ग्वाही दिली आहे. विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीत १२ सदस्य असतात. प्रत्येक पक्षाच्या २० सदस्यांपाठी एक असे १२, १३ प्रतिनिधी या समितीत असतात. विरोधकांची संख्या बसत नसतानाही आम्ही त्यांचा या समितीत समावेश केला आहे. कारण मला वाटतं की सभागृहाचं कामकाज योग्यरित्या चालवण्यासाठी सत्तारूढ पक्ष व विरोधकांमध्ये सहकार्य असणं आवश्यक आहे.

Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!

राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

विधानसभा अध्यक्ष म्हणाले, “माझं ध्येय आहे की येत्या काळात महाराष्ट्र विधानसभेच्या बैठका या अत्यंत नियमाने व योग्यरित्या चालाव्या. विधानसभेचा एकही मिनिट वाया जाता कामा नये. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेचा प्रत्येक मिनिट सकारात्मक चर्चेसाठी वापरला जायला हवा. त्यासाठीच मी विरोधक व सत्तारूढ पक्षांना बरोबर घेऊन काम करू इच्छितो. मागील अडीच वर्षांमध्ये मला दोन्ही बाजूचं सहकार्य मिळालं. त्यामुळेच मी उत्तम पद्धतीने अडीच वर्षे विधानसभेचं कामकाज करू शकलो”.

हे ही वाचा >> “समुहाने निवडून दिलेली राजेशाही…”, निवडणुकीनंतर मराठी दिग्दर्शकाची सूचक पोस्ट; म्हणाला, “लोकशाहीच्या नावाखाली…”

विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का?

दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी राहुल नार्वेकरांना प्रश्न विचारला की विधानसभेला विरोधी पक्षानेता मिळणार का? यावर नार्वेकर म्हणाले, “याबाबत विधानसभा निर्णय घेत असते. नियमानुसार महाराष्ट्र विधानसभा नियमात ज्या तरतुदी असतील, तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या प्रथा-परंपरेच्या अनुषंगाने मी योग्य तो निर्णय घेईन”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul narwekar on will maharashtra assembly get opposition leader asc