राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. नार्वेकर म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमताचा विचार करावा लागेल. अजित पवार गटाकडे ५३ पैकी ४१ आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे.” तसेच दोन्ही गटाच्या याचिका फेटाळून लावत कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवत नसल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, आज जरी आम्ही अपात्र झालो नसलो तरी एकंदरीत जो निकाल नार्वेकरांनी दिला आहे, त्यावरून कायद्याची पायमल्ली झालीय, हे निश्चित आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “पक्षांमधील आयाराम गयाराम पद्धत रोखण्यासाठी घटनेत दहावं परिशिष्ट नमूद करण्यात आलं आहे. पूर्वी ५० टक्के सदस्य बाहेर पडू शकत होते. नंतर हे प्रमाण दोन तृतीयांश करण्यात आलं. हे सगळं असतानाही विधानसभा अध्यक्ष म्हणतात हे माझ्या अधिकारक्षेत्रातच नाही. मग दोन वर्षं काय अंडी उबवत होता का?” राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल देताना नार्वेकरांनी १० व्या परिशिष्टाचा वापर केला नाही, असा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार विरोधी पक्षनेते असताना त्यांनी समृद्धी महामार्गावरील एका अपघातावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. ३ जून रोजी त्यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली होती की, तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? त्यावेळी अजित पवार आपल्या शैलीत म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष एकच, ते म्हणजे शरद पवार. एवढं सगळं बोलूनही जर विधानसभा अध्यक्षांना काहीही दिसत नसेल तर ते धृतराष्ट्र आहेत की काय? असा प्रश्न पडला आहे. असे धृतराष्ट्र महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करतील.
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांसह विरोधी पक्षांच्या टीकेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलं आहे. नार्वेकर म्हणाले, संविधानात दिलेल्या तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाने सूचवलेली मार्गदर्शक तत्वे आणि आपत्रतेच्या संदर्भातील नियमांच्या आधारावर मी हा निर्णय दिला आहे. अत्यंत सुस्पष्ट भाषेत निकाल जाहीर केला आहे. तसेच हा निकाल देताना मी जी कारण दिलं आहेत ती कायद्याच्या कसोटीवर योग्य आहेत.
“राऊतांसारख्या घटनातज्ज्ञांना उत्तर देऊ शकत नाही”
राहुल नार्वेकर म्हणाले, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासारख्या घटनातज्ज्ञांच्या टिप्पणीवर उत्तर द्यायला मी असमर्थ आहे. या महान लोकांना मी उत्तर देऊ शकत नाही. ज्या लोकांना १० व्या परिशिष्टाची माहिती नाही तेच लोक अशी टीका करू शकतात. हे लोक मेरिटवर बोलू शकत नाहीत. हे लोक केवळ ‘धृतराष्ट्र’, ‘काळीमा फासणारा निर्णय’ वगैरे शब्दांत टीका करू शकतात. यांच्यावर मी बोलणार नाही.
हे ही वाचा >> “शरद पवारांनी ती गोष्ट केली असती तर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल वेगळा असता”, उज्ज्वल निकमांचं वक्तव्य
निकाल देताना घटनेतील १० व्या परिशिष्टाचा वापर केला नाही?
दरम्यान, यावेळी नार्वेकर यांना विचारण्यात आलं की, विरोधक आरोप करत आहेत की तुम्ही आमदार अपात्रतेचा निकाल देताना घटनेतील १० व्या परिशिष्टाचा वापर केलेला नाही. त्याबद्दल काय सांगाल. या प्रश्नावर उत्तर देताना नार्वेकर म्हणाले, मी घटनेतील १० व्या परिशिष्टाचा वापर करूनच हा निकाल दिला आहे. ज्यांना घटनेतील काही कळत नाही त्यांनी यावर वक्तव्य करणं आणि त्यांच्या वक्तव्यांवर मी प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही.