विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. या निकालानुसार शिवसेनेचे (दोन्ही गटातील) सर्व आमदार पात्र ठरले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. या निकालाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच त्यांच्या पक्षातील नेतेमंडळी उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे अध्यक्ष असल्याचे वेगवेगळे दस्तऐवज लोकांसमोर मांडून नार्वेकरांनी चुकीचा निकाल दिल्याचा दावा करत आहेत. यावर नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुभाष देसाई विरुद्ध राज्यपाल या प्रकरणाचं वाचन करताना राहुल नार्वेकर म्हणाले होते, दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत, त्यामुळे मी निवडणूक आयोगाने दिलेली घटना विचारात घेतली आहे. दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण यावरुन गोंधळ असल्याचं दिसलं. उद्धव ठाकरेंनी जी शिवसेनेची घटना दिली होती त्यावर कुठलीही तारीख नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली शिवसेनेची १९९९ ची घटना मी मान्य करतो. त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे उलटतपासणीसाठी आले नाहीत त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र विचारात घेतलेलं नाही.
या निकालानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी २०१३ मधील शिवसेनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. २०१३ मध्ये राहुल नार्वेकरही शिवसेनेत होते. त्यामुळे या व्हिडीओमध्ये शिवसेनेच्या तत्कालीन सर्व नेत्यांबरोबर राहुल नार्वेकरही दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी निवड झाली तेव्हा राहुल नार्वेकरही तिथे उपस्थित होते. तरीदेखील त्यांनी एकनाथ शिंदे यांना पक्षाचं अध्यक्षपद कसं काय दिलं? यावर उत्तर देताना राहुल नार्वेकर म्हणाले, तो व्हिडीओ दाखवण्याऐवजी त्यांनी खरोखर पक्षाची घटना दुरुस्त करून संबंधित कागदपत्रे सादर करायला हवी होती.
राहुल नार्वेकर म्हणाले, २०१८ मध्ये खरंच शिवसेनेच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती का? त्यांनी दिलेली घटना ग्राह्य धरायची की शिवसेनेने १९९९ मध्ये निडणूक आयोगाला दिलेली घटना ग्राह्य धरायची? २०१३ मध्ये झालेल्या पक्षप्रमुखपदाच्या निवडीचा इथे विषयच नाही. त्यांनी (ठाकरे गट) माझे फोटो दाखवण्यापेक्षा, मी कुठे होतो याचे व्हिडीओ दाखवण्यापेक्षा वेळेत आणि खरोखर घटना दुरुस्त केली असती आणि ती आम्हाला दाखवली असती तर तुमच्यावर हा प्रसंगच आला नसता.
हे ही वाचा >> “…तर आमदार अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाईल”, दोन्ही गटांच्या न्यायालयातील याचिकांनंतर नार्वेकरांचं मोठं वक्तव्य
अनिल परबांच्या दाव्यावरही उत्तर दिलं
दरम्यान, अनिल परब यांनी केलेल्या दाव्यांवरही नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अनिल परब ४ एप्रिल २०१८ मधलं एक पत्र दाखवून सांगत आहेत की आम्ही निवडणूक आयोगाला हे पत्र दिलं होतं. या पत्रावर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आहे. ते पत्र सुनावणीच्या वेळी माझ्याकडे दिलं गेलं, मी ते माझ्या रेकॉर्डवर घेतलं होतं. परंतु, वस्तूस्थिती अशी आहे की, त्या पत्रात पक्षाच्या संविधानाबद्दल एक शब्दही लिहिलेला नाही. ते पत्र केवळ शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका होऊन त्याचे निकाल निवडणूक आयोगाला कळवत असल्याचं होतं. त्यामध्ये कुठेही पक्षाची घटना दुरुस्त केली असल्याचा साधा उल्लेखही नाही.