Rahul Narwekar on NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा बहुप्रतीक्षित निकाल आज जाहीर करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर, पुरावे तपासून आणि दोन्ही गटांमधील आमदारांची उलटतपासणी पूर्ण करून या प्रकरणाशी संबंधित पाच प्रमुख याचिकांवर निकाल दिला. नार्वेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार या प्रकरणाचा निकाल देताना आम्ही तीन महत्त्वाचे निकष तपासले. पक्षाची घटना, पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचं विधिमंडळातील बलाबल पाहून यासंदर्भातला निर्णय घेतला आहे.
राहुल नार्वेकर निकाल वाचून दाखवताना म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे ठरवताना विधिमंडळातील बहुमाताचा विचार करावा लागेल. विधीमंडळात अजित पवार गटाचे ५३ पैकी ४१ आमदार आहेत. तर उर्वरित १२ आमदार शरद पवार गटात आहेत. तसेच अजित पवारांकडे असलेल्या या बहुमताला शरद पवार गटाने अव्हान दिलेलं नाही. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे. अजित पवार गटाला विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. नेतृत्व संरचना किंवा पक्ष संघटनेवरून कोणता गट पक्ष आहे हे निश्चित होत नाही. त्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळानुसार अजित पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याच्या निष्कर्षावर मी आलो आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटातील आमदारांना पात्र ठरवलं आहे. पक्षाचे विधीमंडळातील मुख्य प्रतोदही त्यांच्याबरोबर असल्याचा दाखला नार्वेकर यांनी यावेळी दिला. दुसऱ्या बाजूला त्यांनी शरद पवार गटातील आमदारांनाही पात्र ठरवलं आहे. नार्वेकर म्हणाले, अजित पवार आणि शरद पवारांच्या गटांमधील वाद हा पक्षांतर्गत आहे. त्यामुळे कोणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळेच या आमदारांवर घटनेतील १० व्या परिशिष्टानुसार कारवाई करता येत नाही. त्याचबरोबर अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केली असंही म्हणतात येत नाही. त्यामुळे पक्षातील सर्व आमदारांना पात्र ठरवण्यात येत आहे.
हे ही वाचा >> “…अन् तेव्हापासून महिलांचा लष्करात समावेश”, शरद पवारांनी सांगितला संरक्षणमंत्री असतानाचा ‘तो’ प्रसंग!
पक्षाचा खरा अध्यक्ष कोण?
विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. तर दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. तसेच पक्षाध्यक्षपदी आता जे आहेत, त्यांची निवड योग्य प्रक्रियेनुसार झाली नसल्याचाही दावा दोन्ही गटांनी केला होता. ३० जून २०२३ रोजी अजित पवारांना पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शरद पवार गटाने या प्रक्रियेला विरोध केला होता. यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे ३० जून रोजीच स्पष्ट झाले होते. अजित पवारांची निवडणूक पक्षघटनेच्या विरोधी आहे असा दावा शरद पवार गटाने केला आहे. पक्षाचा अध्यक्ष कोण आहे? हे मी ठरवू शकत नाही, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.