अयोध्यानगरीत आज (२२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. उद्यापासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी जातील. महाराष्ट्रातील भाविकही अयोध्येला जातील. दरम्यान, महाराष्ट्रातील भाविकांसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, राज्य सरकारकडून महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी अयोध्येत भक्त धर्मशाळा बांधली जाईल.
राहुल नार्वेकर म्हणाले, अयोध्येत राम मंदिर उभारलं जावं अशी आमची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती, जी आज पूर्ण झाली आहे. संपूर्ण भारतातील नागरिकांची मनोकामना आज पूर्ण झाली आहे. देशातील, राज्यातील, कुलाबा मतदार संघातील, कफ परेड भागातील लोकांनी राम मंदिरात झालेल्या प्राणप्रतिष्ठेबद्दल आनंद व्यक्त केला. मी त्यांना शुभेच्छा देतो. लवकरच मीसुद्धा अयोध्येला जाणार आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले, मी तुम्हा वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांसाठी, त्यांच्या निवसासाठी भक्त धर्मशाळा उभारली जाईल. लोकांना तिथे राहता यावं यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे अयोध्येत इमारत उभारली जाईल.
हे ही वाचा >> “एकदा या आणि दूध का दूध…”, मनोज जरांगेंचं अजित पवारांना आव्हान; म्हणाले, “सात महिन्यांत तुम्ही…”
मंदिर उभारलं, आता पुढे काय? नरेंद्र मोद म्हणाले…
दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले, “प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर तर बनले, आता पुढे काय? शतकांपासूनची प्रतीक्षा तर संपली, आता पुढे काय? आता पुढची हजार वर्षे भारतावर प्रभाव टाकेल, असं कार्य आपल्याला करायचं आहे. आज या शुभ प्रसंगी ज्या दैवी शक्ती आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत, आपल्याला पाहत आहेत. त्यांना आपण असाच निरोप द्यायचा का? आज मी पवित्र मनाने अनुभूती घेत आहे की, कालचक्र बदलत आहे. आमच्या पिढीला एका विशेष कामासाठी निवडलं आहे. हजार वर्षांनंतरची पिढी राष्ट्रनिर्माणाच्या आजच्या कामांचे स्मरण करेल. म्हणून मी सांगतो, हीच ती वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे. आम्हाला आजपासून पुढच्या हजारो वर्षांच्या भारताचा पाया रचायचा आहे. मंदिर निर्माणाच्या पुढे जाऊन सर्व नागरिकांनी समर्थ, सक्षम, भव्य-दिव्य भारत निर्माणाची शपथ घेऊया”