शिवसेना पक्षात गेल्या वर्षी मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला आणि भाजपाबरोबर हातमिळवणी केली. परिणामी राज्यातलं उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपाने मिळून राज्यात सरकार स्थापन केलं आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंच्या गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवलं जावं अशी मागणी केली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने आपण विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही असं म्हणत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी आज (१४ सप्टेंबर) पहिली सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज पहिली सुनावणी पार पडली.

उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाने सादर केलेले पुरावे आणि प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केल्यानंतर, तसेच दोन्ही गटातील आमदारांची मतं ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल देतील. दरम्यान, आजच्या सुनावणीत नार्वेकर यांनी दोन्ही गटांना याचिकेशी संबंधित कागदपत्र एकमेकांना सोपवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी पुढील सुनावणीसाठी येत्या आठ दिवसांत (२२ किंवा २३ सप्टेंबर) आणि १० दिवसांनंतर (२५ सप्टेंबर) अशा दोन तारखा दिल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी दिली.

दरम्यान, पहिल्या दिवसाची सुनावणी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधान भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले, मी कुठल्याही आरोप प्रत्यारोपांवर भाष्य करणार नाही. मी सध्या न्यायिक अधिकारांतर्गत काम करतोय. त्यामुळे माझ्यासमोर जी सुनावणी होत आहे त्यासंदर्भात बाहेर कुठलंही भाष्य करणं मला उचित वाटत नाही. या कायदेशीर प्रक्रियेविषयी बाहेर बोलणं उचित नाही. ज्यांना बाहेर आरोप करायचे आहेत, त्यांनी खुशाल करावेत. त्यांनी आरोप केले तरी मी नियमांनुसार आणि घटनेत ज्या तरतुदी आहेत त्याच्या अनुषंगानेच काम करणार. या सुनावणीसाठी म्हणजेच ही कारवाई पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ आम्ही दिला आहे. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर वादी आणि प्रतिवाद्यांना पुढच्या सुनावणीची तारीख कळवली जाईल.

हे ही वाचा >> “खरे प्रतोद कोण? हा कळीचा मुद्दा ठरला तर…”, आमदार अपात्रतेसंदर्भात आमदार भरत गोगावले स्पष्टच बोलले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सुनावणीनंतर शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं की आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. व्हीप न पाळल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी आमदार सुनील प्रभू यांनी यांनी त्यांच्या याचिकेद्वारे केली आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांतील आमदारांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांची कागदपत्रं एकमेकांना द्यावीत. यानंतर पुढची तारीख दिली जाईल.