शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन आले. ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. शेवाळे यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.
दरम्यान, खासदार शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर हरकत घेतली. त्यांनी सभापतींकडे विनंती केल्यानंतर संबंधित आरोप संसदेच्या कामकाजातून वगळले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले, “शिंदे गटाच्या एका खासदाराने सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे आरोपी आहेत, असं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न अत्यंत निधेषार्ह आहे. आम्ही माननीय सभापतींकडे याबाबत हरकत घेतली. आदित्य ठाकरेंबाबत केलेला उल्लेख सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याचा आग्रह धरला. यानंतर सभापतींनी आमची मागणी मान्य केली. पण गद्दार गटाच्या खासदाराचा मला धिक्कार करावासा वाटतो,” अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी केली.
हेही वाचा- राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांचं लग्न आम्ही…”
राहुल शेवाळे लोकसभेत नेमकं काय म्हणाले?
राहुल शेवाळे लोकसभेत म्हणाले की, “रिया चक्रवर्तीच्या फोन कॉल्सचा तपास केला गेला का? किंवा ती महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्याच्या संपर्कात होती, त्यांच्यात मैत्री होती, हे खरं आहे का? बिहार पोलिसांच्या तपासात ‘एयू’चा उल्लेख करण्यात आला. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रियाला ‘एयू’ संपर्क क्रमांकावरून ४४ फोन कॉल आले. ‘एयू’चा अर्थ ‘अनन्या उद्धव’ असा काढण्यात आला. पण बिहार पोलिसांनी केलेल्या तपासात ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा काढण्यात आला आहे, याचाही तपास व्हायला हवा. ‘एयू’ हा विषय अतिशय गंभीर आहे. एयूचा अर्थ अनन्या उद्धव असा नाही, एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, हे बिहार पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयचा तपास वेगळा आहे. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याची माहिती लोकांना मिळायला हवी.”