छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतल्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी केलेला दावा गेल्या काही दिवासांपूर्वी चांगलाच चर्चेत आला आहे. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. याबाबत आता इतिहासकार इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले इंद्रजीत सावंत?

“आग्र्याहून सुटका करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच दिली असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं. या विधानाला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही. छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाच्या तावडीतून जी सुटका करुन घेतली ती एक महान गोष्ट म्हणून जगाच्या इतिहासात ओळखली जाते. त्यावेळची कागदपत्रं प्रकाशित आहेत. समकालीन कागदपत्रं उजेडात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच दिली आणि निवांत आग्र्याहून राजगडपर्यंत निसटून आले असा उल्लेख नाही. उलट शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले त्यानंतर औरंगजेबाने जे आदेश दिले आहेत त्याची नोंद इतिहासात आहेत. जिथे शिवाजी महाराज दिसतील तिथे त्यांना दस्त करावं, चौफेर खबरदारी बाळगावी. थोडक्यात त्यांना पुन्हा पकडून आणावं असेच आदेश दिले होते.”

राहुल सोलापूरकर यांनी महाराष्ट्राचं मन दुखावलं आहे त्यांनी माफी मागावी-इंद्रजीत सावंत

इतिहासाची कागदपत्रं शिवाजी महाराजांच्या सुटकेबाबत सगळी माहिती आपल्याला उपलब्ध करुन देतात. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला जाणं, दरबारात काय घडलं ते वर्णन हे त्यावेळच्या राजपूत लोकांनी जी पत्रं पाठवली आहेत त्यात बारीकसारीक नोंदी आहेत. त्यामध्ये लाच दिल्याची कुठलीही नोंद नाही. सोलापूरकर हे विनाकारण शिवाजी महाराजांचा जो महान पराक्रम आहे, अत्यंत क्रूर असलेल्या औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवाजी महाराज आले. हा पराक्रम होता. या पराक्रमाला गालबोट लागेल असं विधान राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. महाराष्ट्र सरकारने याची गंभीर दखल घेणं आवश्यक आहे. मी तो व्हिडीओ पाहिला, गंमत म्हणून सांगतो असं त्यांचं सांगणं आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास गंमत नाही. अनेक लोकांनी स्वतःचं आयुष्य खर्ची घालून तो लिहिला आहे. कुठलाही अभ्यास नसताना सोलापूरकर यांनी असं बोलणं थांबवलं पाहिजे. महाराष्ट्राचं मन दुखवल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी इंद्रजीत सावंत यांनी केली.

राहुल सोलापूरकर यांचं वक्तव्य काय?

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावं म्हणून हिरकणीची कथा रचली गेली आहे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत. हिरकणी घडलेलीच नाही. असं काहीही नाही. असा इतिहासच नाही. पण लिहिलं गेलं. महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले आहेत महाराज, त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली आहे. मौसिन खान किंवा मौईन खान नाव आहे त्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले आहेत. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे अजूनही. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितलं गेलं आहे. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही. असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. ज्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला असून आता इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली पाहिजे असं म्हटलं आहे.