अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी उंबरे (ता. राहुरी) येथील दोन दूध संकलन केंद्रांवर छापा टाकला. या केंद्रांवर कृत्रिम दुधाची निर्मिती केली जात असल्याचे आढळून आल्याने सुमारे २ हजार ५०० लीटर दूध नष्ट केले. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंदवण्याचे काम सुरू होते.
तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पूर्वी छापे टाकून कृत्रिम दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यानंतर या दुधाची निर्मिती करण्याचे थांबले होते. पण आता कडासने यांची बदली झाल्यानंतर पुन्हा हा उद्योग सुरू झाला आहे. श्रीरामपूर, राहुरी व नेवासे हे या दूधनिर्मितीचे केंद्र बनले आहे. जिल्ह्यात लाखो लीटर कृत्रिम दुधाची निर्मिती राजरोसपणे केली जाते. आता राहुरी तालुक्यात कृत्रिम दूध मोठय़ा प्रमाणावर तयार केले जाते.
अन्न व औषध प्रशासनाला उंबरे (ता. राहुरी) येथे कृत्रिम दूध तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. शनिवारी सकाळी ६ वाजता अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक प्रदीप कुटे, एस. के. पाटील, अनंत पवार, प्रसाद कसबेकर, उमेश कांबळे यांनी दोन दूध संकलन केंद्रांवर छापे टाकले. या वेळी दोन पथके तयार करण्यात आली होती. एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. उपसरपंच गीताराम ढोकणे यांच्या कुलस्वामिनी दूध केंद्रावर छापा टाकला असता रसायन, तेल, मिक्सर आढळून आले. या वेळी सुमारे १ हजार ५३० लीटर कृत्रिम दूध नष्ट करण्यात आले. शिवसेनेचे तालुका उपप्रमुख विजय ढोकणे यांच्या सज्जनवाडी केंद्रावर छापा टाकून ८९६ लीटर दूध नष्ट करण्यात आले. एक मिक्सर, रसायनांचे पिंप, एक वाहतूक मोटार ताब्यात घेण्यात आली. दोन्ही केंद्रांवरील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या कारवाईबद्दल पथकाच्या अधिका-यांनी मोठी गुप्तता पाळली. सकाळी ६ वाजता छापा टाकण्यात आला, पण सायंकाळी ७ वाजेपर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्याचे काम सुरूच होते.

Story img Loader