अकोला : शहरातील औद्योगिक वसाहतीतील कृषी खत कंपनीवर कृषी विभागाच्या कथित पथकाकडून छापा टाकण्यात आल्याचा प्रकार आता चांगलाच वादात सापडला आहे. छापा टाकणाऱ्या पथकामध्ये कृषिमंत्र्यांच्या स्वीय सहायकासह काही खासगी व्यक्ती असल्याचा आरोप आहे. या पथकाने दमदाटी करून पाच लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसांकडे देण्यात आली. याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सारवासारव करीत माझ्या सांगण्यावरूनच छापे टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका कार्यक्रमानिमित्त कृषिमंत्री अब्दुल सत्तार १० जून रोजी अकोल्यात आले होते. त्यापूर्वीच ७ जूनपासून कृषिमंत्र्यांशी संबंधित असलेल्या काही व्यक्तींच्या पथकाकडून शहरातील कृषी व्यावसायिकांच्या गोदामावर छापेमारी सुरू करण्यात आली. खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे, खते व कीटकनाशके कंपनीच्या पुरवठाधारकांच्या गोदामांची कृषी विभागाकडून दरवर्षीच तपासणी होत असते. दरम्यान, पुणे येथील कृषी उत्पादन गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत ७ जून रोजी छापा टाकण्यात आला. यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह हितेश सुरेश भट्टड, दीपक गवळी, दीपक राजपूत, भीमराव कुळकर्णी व छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, नागपूर येथील हितेश भट्टड यांच्यावर कृषी संबंधित घोटाळय़ाचे अनेक गुन्हे आहेत. कृषिमंत्र्यांच्या नावावर पथकाने औद्योगिक वसाहतीमधील कंपनीच्या गोदामावर छापा टाकल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक राजेश शिंदे यांनी कायद्याने कारवाई करण्याचा मुद्दा उचलला. या पथकातील खासगी व्यक्तींनी मालाची नासधूस केली. काही उत्पादकांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला. पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप कंपनीच्या व्यवस्थापकाने तक्रारीत केला आह. हा आरोप झाल्यावर पथक माघारी फिरले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, अकोला दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी सारवासारव केली.

खासगी व्यक्तींकडून अधिकाऱ्यांनाच सूचना ..

पथकातील खासगी व्यक्ती कृषी विभागातील अधिकाऱ्यांना व्यावसायिकांवर कारवाई करण्यासंदर्भात सूचना व निर्देश देत होते. कृषी व्यावसायिकांनी अधिकाऱ्यांना विचाारले असता त्यांनी ते आमचे वरिष्ठ असल्याचे सांगितले, असे कृषी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांसह सर्वानाच छापे टाकण्याचा अधिकार आहे. माझ्या सांगण्यावरूनच ते छापे टाकण्यात आले, त्यामध्ये माझे स्वीय सहायक नव्हते. व्यावसायिकांना काही अडचण असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. कृषी, महसूल व पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक तयार करून छापे टाकावे, अशी माझी भूमिका आहे. बियाणे, खत व कीटकनाशकांमध्ये गैरकारभार खपवून घेणार नाही.

 – अब्दुल सत्तार, कृषिमंत्री.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raid on fertilizer company of minister abdul sattar close aide zws
Show comments