हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथे सावकाराच्या घरावर छापा टाकून सहा खरेदीखतं, चार इसार पावत्या, कोरे शपथपत्र व डायरी जप्त करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विभागाचे अधिकारी व पोलीस विभागाच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. अवैध सावकारीविरोधात जिल्ह्यात टाकलेला हा तिसरा छापा असून अवैध सावकारी करणाऱ्यांचे या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अवैध सावकारीबाबत ३०हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. या पाश्र्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध सावकारी करणाऱ्यांच्या घरावर पथकाकडून छापे टाकले जात आहेत. यापूर्वी टाकलेल्या छाप्यात औंढा तालुक्यातील ढेगज येथे दोन भावांकडील २९ खरेदीखतांचे दस्तावेज जप्त केले. नंतर १८ जुलस कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे चौघांकडून खरेदीखतासह शंभर रुपयांचे चार कोरे मुद्रांक, शपथपत्र शेती खरेदीविषयक दस्तावेज पथकाने जप्त केले.
या छाप्याची जिल्हाभर चर्चा सुरू असतानाच बुधवारी फाळेगाव येथे सावकाराच्या घरावर सहायक निबंधक बी. एस. हराळ, बी. डी. पठाडे, वाय. एस. अरसोडे, ए. के. तुरपाम, पी. एल. डुकरे या पथकाने छापा टाकून अवैध सावकारी करणाऱ्याकडून सहा खरेदीखतं, चार इसार पावत्या व कोरे शपथपत्र, पशाची देवाण-घेवाण केल्याची नोंदवही, हक्कसोड पत्र जप्त केले. जप्त केलेले खरेदीखत तहसील कार्यालयात पाठवून त्या संबंधाने सात-बारावरील नोंदी, फेर या बाबत तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांकडून कळाले.
सहा खरेदीखतं, चार इसार पावत्या, कोरे शपथपत्र जप्त
हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथे सावकाराच्या घरावर छापा टाकून सहा खरेदीखतं, चार इसार पावत्या, कोरे शपथपत्र व डायरी जप्त करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विभागाचे अधिकारी व पोलीस विभागाच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली.
First published on: 24-07-2014 at 01:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raid on jew house