तालुक्यातील सुपे औद्योगिक वसाहतीमधील आम इंडिया कंपनीमध्ये केंद्रीय अबकारी कर विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास छापा टाकून कसून चौकशीस सुरुवात केली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. चौकशी सुरू असताना कंपनीचे मुख्य प्रवेशद्वार सील करण्यात आले होते.
वाहनांचे अ‍ॅक्सल तयार करणा-या सुपे औद्योगिक वसाहतीतील या सर्वात मोठय़ा कंपनीमध्ये हा छापा पडल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दुपारी अडीचच्या सुमारास अबकारी विभागाचे पथक अंबर दिव्याच्या एका वाहनातून आम इंडिया या कंपनीमध्ये पोहोचले. तेथे पोहोचताच पथकातील कर्मचा-याने मुख्य प्रवेशद्वाराचा ताबा घेऊन ते कुलूपबंद केले. या पथकात दोन अधिकारी व एका शिपायाचा समावेश असल्याची माहिती आहे.
कंपनीच्या कार्यालयात जाऊन तेथील विविध कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. काही आक्षेपार्ह कागदपत्रे या पथकाने ताब्यात घेतली असून कर्मचा-यांचीही कसून चौकशी सुरू आहे. विविध वाहनांचे अ‍ॅक्सल तयार करण्यासाठी या कंपनीमध्ये परदेशातून कच्च्या मालाची आयात करण्यात येते. तयार झालेल्या उत्पादनाची देशासह परदेशात विक्री केली जाते. परदेशातून कंटनेरद्वारे आलेल्या कच्च्या मालाचा अबकारी कर भरताना या कंपनीकडून शासनाची दिशाभूल करण्यात येत असल्याची माहिती असून त्यामुळेचे या खात्याच्या पथकाने कंपनीमध्ये छापा टाकून चौकशी सुरू केली असल्याचे समजते. या संदर्भात अबकारी कर खात्याने कंपनीस यापूर्वी काही नोटिसाही बजावल्या होत्या. परंतु कंपनी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा छापा टाकण्यात आल्याचीही अनधिकृत माहिती आहे.
यापूर्वी सन २०१० मध्ये व त्यापूर्वीही एकदा केंद्रीय अबकारी कर विभागाच्या पथकाने या कंपनीवर छापा टाकून चौकशी केली होती. कच्च्या मालाचा या कंपनीने भरलेला कर व प्रत्यक्षात आढळून आलेला कच्चा माल यामध्ये मोठी तफावत असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले होते. मोठी हेराफेरी झाल्याचे निष्पन्न होऊनही या पथकाने त्या वेळी केलेल्या मॅरेथॉन कारवाईनंतर प्रत्यक्षात कंपनीवर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नव्हती.

Story img Loader