रायगड जिल्ह्य़ाचा २०१५-२०१६ या वर्षांचा २१७ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. या आराखडय़ात जिल्हा वार्षकि नियोजनासाठी (सर्वसाधारण) १४१ कोटी ५१ लाख, आदिवासी उपयोजना व उपयोजना बाह्य़क्षेत्रासाठी ५२ कोटी ८५ लाख ९४ जहार तर अनुसूचित जाती उपयोजनांसाठी २३ कोटी २३ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे .यात पाणीपुरवठा व स्वच्छतेला झुकते माप देण्यात आले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी २४ कोटी ३६ लाख ११ हजार एवढी तरतूद करण्यात आली आहे.
रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात शुक्रवारी झाली. या बठकीत आराखडा मंजूर करण्यात आला. या वेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, खासदार श्रीरंग बारणे, आमदार जयंत पाटील, आमदार धर्यशील पाटील, आमदार सुभाष पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले यांच्यासह जिल्हाधिकारी सुमंत भांगे, पोलीस अधीक्षक शशिकांत महावरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील उपस्थित होते.
प्रारूप आराखडय़ात कृषी व संलग्न सेवांसाठी २३ कोटी २३ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात कृषीसाठी ७३ लाख ८७ हजार, फलोत्पादन १ कोटी ३० लाख, मृदू व जलसंधारण १ कोटी ७६ लाख, पशुसंवर्धन ३ कोटी १ लाख, मत्स्यव्यवसाय ३ कोटी ९५ लाख, वन विभागासाठी ११ कोटी ५२ लाख ५७ हजार, ग्रामविकास ६ कोटी ९६ लाख ८ हजार अशी तरतूद आहे.
सामाजिक व सामूहिक सेवांसाठी ५८ कोटी ९२ लाख ७२ हजार रुपयांची तरतूद आहे. शिक्षणसाठी ६४ लाख, तंत्रशिक्षण ६ कोटी ४९ लाख ५१ हजार, व्यवसाय शिकाष्ण २६ लाख, ग्रंथालय २२ लाख, क्रीडा २ कोटी ८४ लाख ५४ हजार, समाज कल्याण ३ कोटी ९० लाख, अंगणवाडी ३ कोटी, आरोग्य ७ कोटी २० लाख ५४ हजार, पाणीपुरवठा व स्वच्छता २४ कोटी ३६ लाख ११ हजार, नगर विकास १० कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे.
लघू पाटबंधारे व पूरनियंत्रण ५ कोटी १० लाख, ऊर्जा ५० लाख, लघू उद्योग ५४ लाख, बंदरे व दीपगृह १ कोटी ६१ लाख, साकव १० कोटी, इतर जिल्हा रस्ते १८ कोटी, ग्रामीण रस्ते ४ कोटी ५० लाख, यात्रा व पर्यटन स्थळे २ कोटी २० लाख, जिल्हा नियोजन बळकटीकरण १५ लाख, जिल्हा नियोजन भवन २ कोटी ५० लाख, पशुसंवर्धन ११ लाख १० हजार, जिल्हा माहिती कार्यालय १० लाख अशी तरतूद करण्यात आली आहे.
चालू आíथक वर्षांत मंजूर करण्यात आलेल्या निधीपकी जवळपास ६९ टक्के निधी विकास कामावर खर्च झाला असून मार्चअखेर 100 टक्के विकास कामे मार्गी लागतील, असा विश्वास पालकमंत्री मेहता यांनी व्यक्त केला.
 विभागीय अधिकारी गैरहजर
प्रकाश मेहता रायगडचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रथमच जिल्हा नियोजन समितीची बठक आयोजित करण्यात आली होती. परंतु आजच्या सभेला विभागीय अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे तांत्रिक बाबींना मंजुरी देऊन शुक्रवारची सभा स्थगित करण्यात आली. जिल्हा नियोजन मंडळाच्या बठकींना विभागीय स्तरावरील अधिकारी सातत्याने गरहजर राहत असल्याबद्दल या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी या वेळी स्पष्ट केले. पुढील आठवडय़ात पुन्हा एकदा बठक लाऊन याबाबत निर्णय घेतले जातील. रायगडाचा २१७ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा असला तरी अर्थमंत्र्यांकडे होणाऱ्या राज्यस्तरीय बठकीत निधी वाढवून घेऊ. रायगडसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी बठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

Story img Loader