अलिबाग- मुंबई गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा या मागणीसाठी जनआक्रोश समितीकडून आज माणगाव बंदची हाक देण्यात आली होती. या माणगावकरांनी कडकडीत बंद पाळत यास प्रतिसाद दिला. यानंतर आंदोलक आणि स्थानिकांनी रस्त्यावर उतरून महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

जनआक्रोश समितीच्या वतीने मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी गेल्या सहा दिवसांपासून अमरण उपोषण सुरू होते. आंदोलन करणाऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर संवाद साधला होता. महामार्गाच्या प्रश्नाबाबत १९ ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक बोलवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही बैठक झालीच नाही. आंदोलकांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाल्याने, जनआक्रोश समितीने मंगळवारी माणगाव बंदची हाक दिली होती. या बंदला माणगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळच्या सत्रात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. व्यापारी संघटनांनी बंदला पाठींबा दिला.

हेही वाचा – Badlapur School Case : “फास्ट ट्रॅक कोर्ट नको, आरोपीला आजच भरचौकात…”, बदलापूर स्थानकात आंदोलकांच्या मागणीला जोर!

यानंतर शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत आंदोलकांनी मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. माणगाव बस स्थानकासमोर रस्त्यावर उतरत दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली. त्यामुळे महामार्गावर काही काळ दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस आणि प्रशासनाने हस्तक्षेप करून आंदोलकांची समजूत काढली. यानंतर आंदोलकांनी शासनाच्या निष्क्रियतेचे निषेध करत हे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा – Girish Mahajan : “ज्या पोलिसांनी दिरंगाई केली, त्यांना सोडलं जाणार नाही, कृपया आंदोलन थांबवा”, मंत्री महाजनांची कळकळीची विनंती

गेली सहा दिवस आम्ही महामार्गाच्या प्रश्नासाठी आंदोलन करत होतो. आंदोलन करणाऱ्या मुलांची प्रकृती खालावू लागली होती. त्यामुळे त्यांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता होती त्यामुळे शासनाच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध करून आम्ही आमचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. – अजय यादव, जनआक्रोश समिती