किनारपट्टीवरील भागात वाढीव पोलीस बंदोबस्त, रेव्ह पाटर्य़ावर पोलिसांची नजर
अलिबाग : सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षांच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे सज्ज झाले आहेत. या निमित्ताने पुढील काही दिवसात जिल्ह्यात ५० हजारहून अधिक पर्यटक दाखल होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस दलाने विशेष खबरदारी घेतली आहे. पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तळीराम वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत. सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या तीन स्पीड बोटी रात्रंदिवस गस्ती ठेवण्यात येणार आहेत.
नाताळचा सण आणि नववर्षांच्या स्वागतासाठी कोकणात मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. अलिबाग, मुरुड, दिवेआगर, किहीम, मांडवा, नागाव, आक्षी, रेवदंडा, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेले माथेरानही पर्यटकांनी बहरून गेले आहे. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर कुठेतरी शांत ठिकाणी नवीन वर्षांचे सेलिब्रेशन करावे असा ट्रेन्ड गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळतो आहे. त्यामुळे अलिबाग आणि मुरुड परिसर हा मुंबईकरांची मोठी गर्दी होण्यास सुरवात झाली आहे. गेल्या दोन दिवसात जवळपास २५ हजार पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट दिली आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ठिकठिकाणी न्यू इयर सेलिब्रेशन पार्टीजचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल व्यवसायिकांनी ऑर्केस्ट्रा, डीजे नाइट्स, गाला डान्स, सेलिब्रिटी नाइट्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कपल एन्ट्रीसाठी निरनिराळय़ा ऑफर्स पुरवल्या जात आहेत. अनलिमिटेड फूड आणि ड्रिंक्सची प्रलोभने दिली जात आहेत.
नाताळाचा सण आणि लागोपाठ आलेल्या सुट्टय़ांच्या पार्श्वभूमीवर २४ आणि २५ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात जवळपास २५ हजार पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढली होती. मुंबई गोवा महामार्गासह, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, अलिबाग मुरुड मार्ग, अलिबाग पेण महामार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. वडखळ बायपास ते पेझारी हे आठ ते दहा किलोमीटरचे अंतर पार पाडण्यासाठी दीड ते दोन तास लागत होते. त्यामुळे वाहनचालक आणि प्रावाशांचे हाल झाले होते. त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत.
नववर्षांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मोठय़ा संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन, वाहतूक नियमनासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. वाहतूक नियंत्रणासाठी ८६ ठिकाणी ९० वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. मद्यपी वाहनचालकांवर या सर्वाची नजर असणार आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर तात्पुरत्या पोलीस चौक्या
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. बीट मार्शल्स, दामिनी पथक, साध्या गणवेशातील कर्मचाऱ्यांसह, सशस्त्र पोलीस बंदोबस्त किनाऱ्यांवर ठेवला जाणार आहे. ७६ अधिकारी ४१२ पोलीस अंमलदार तैनात केले जाणार आहेत. जिल्ह्यातील २१० किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर तीन स्पीड बोटींच्या साह्याने २४ तास गस्त घातली जाणार आहे. लाईफ जॅकेट्स, स्पीड बोटी, आणि जीवरक्षक तैनात ठेवण्यात येणार आहेत. पर्यटकांना सूचना देण्यासाठी ध्वनिप्रक्षेपकही बसवण्यात येणार आहे.
रेव्ह पाटर्य़ावर पोलिसांची नजर
रायगड जिल्ह्यात निर्जन ठिकाणी असलेल्या फार्म हाऊसवर रेव्ह पाटर्य़ाचे आयोजन होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांकडे विशेष पथके तयार करण्यात आलेली असून हॉटेल, धाबे, कॉटेज, फार्म हाउस येथे गैरकृत्य होणार नाही याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. दारू पिऊन गोंधळ घालणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस पथके नेमण्यात आलेली आहेत. आमली पदार्थाचे सेवन आणि वितरण होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने साध्या वेशातील पोलीस व महिला अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस दलामार्फत देण्यात आली आहे.