रायगड जिल्हा परिषदेचा २०१३-२०१४ सालचा ५५ कोटी ७८ लाख ८५ हजार रुपयांचा मूळ महसुली अर्थसंकल्प अर्थ समितीचे सभापती संजय जांभळे यांनी आज जिल्हा परिषदेत सादर केला. जांभळे यांच्याकडे बांधकाम विभागाचे सभापतीपददेखील आहे. त्यामुळे त्यांनी सर्व विभागांमधील बांधकामांना झुकते माप दिले आहे. या अर्थसंकल्पामध्ये बांधकाम विभागासाठी १४ कोटी ११ लाख ८५ हजार रुपयांची सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व विभागांमध्ये इतर विकास कामांऐवजी बांधकामांवरच जास्त तरतूद करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधरण सभा ना. ना. पाटील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अर्थ समितीचे सभापती संजय जांभळे आज सूट घालून आले होते. ते अर्थसंकल्प सादर करण्यासाठी उभे राहिले असता आम्हालापण असे कोट द्या, अशी कोपरखळी माजी उपाध्यक्ष भाई पाशीलकर यांनी मारली. शेरोशायरी आणि काव्यापंक्तींनी भाषणची सुरुवात करणारे जांभळे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नेत्यांची नावे घेतली. नावांची यादी थांबली तेव्हा, प्रमोद घोसाळकर राहिले असा टोला विरोधी पक्षनेते अॅड. राजीव साबळे यांनी मारला. त्यामुळे साभगृहात हास्याची लकेर उमटली. अध्यक्षा कविता गायकवाड यांनादेखील हसू आवरता आले नाही.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सामान्य प्रशासनासाठी ७३ लाख ७५ हजार रुपये, शिक्षण विभागासाठी २ कोटी रुपये, बांधकांम विभागासाठी १४ कोटी ११ लाख ८५ हजार रुपये, पाटबंधारे विभागासाठी १ कोटी ८५ लाख रुपये, सार्वजनिक आरोग्यासाठी २ कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकीसाठी ९ कोटी ९० लाख २० हजार रुपये, कृषी विभागासाठी २ कोटी रुपये, पशुसंवर्धनासाठी १ कोटी ५० लाख रुपये, समाजकल्याण विभागासाठी ९ कोटी ९० लाख २० हजार रुपये, अपंग कल्याणसाठी १ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये, सामूहिक विकासासाठी ४ कोटी ९५ लाख १० हजार रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती यांचे मानधन, प्रवास भत्ते, घरभाडे, अध्यक्षांचा अतिथी भत्ता यासाठी ८८ लाख ८२ हजार रुपये देण्यात आले आहेत. सर्व समित्यांच्या सादिल खर्चासाठी ७३ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शाळागृहांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुलांवर संस्कार शिबिरासाठी यंदा प्रथमच तीन लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाचा कार्यक्रम राबविणे व पारितोषिके देणे यासाठी १ लाख ७२ हजार ५००0, शिक्षण विभागातील उपक्रमाकरीता सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी २ लाख रुपये , शाळांना फॉर्मस रजिस्टर पुरविणे यासाठी २ लाख रुपये अशी अर्थसंल्पामध्ये प्रथमच तरतूद करण्यात आली आहे.
रस्ते बांधण्यासाठी एकूण ११ कोटी ४० लाख रुपये खर्चाची तरतूद असून त्यात मार्गदिशा फलक लावण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे. मार्गदिशा फलकांसाठी प्रथमच निधी देण्यात आला आहे.
इमारत बांधणीसाठी ८३ लाख ५१ हजार रुपये, जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीसाठी ९८ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. इमारत दुरुस्ती व देखभालीसाठी २ कोटी ७१ लाख ८५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बांधकाम विभागासाठी एकूण १४ कोटी ११ लाख ८५ हजार रुपयांची सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. गावतळ्यांची दुरुस्ती व देखभाल यासाठी १ कोटी २० लाख तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे घरगुती दीपसंच पुरविणे यासाठी १ कोटी ५० लाख रुपये, शेतकऱ्यांना फळे काढण्यासाठी हायड्रॉलिक सिडी पुरविणे व इलेक्ट्रिक पंप पुरविणे यासाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पशुपालक व दुध उत्पादकांना तांत्रिक मार्गदर्शन व चर्चासत्रांचे आयोजन करण्यासाठी २ लाख देण्यात आले आहेत. मागासवर्गीय वस्तींत रस्ते बांधणे व दुरुस्तीसाठी ४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागासावर्गीय महिला बचत गटांना आíथक साहाय्य देणे तसेच जिल्ह्य़ात भारतीय खेळ वाढविण्यासाठी मागासवर्गीयांना कबड्डी व खो-खो इत्यादी खेळांसाठी साहाय्य करणे, मागासवर्गीयांना कुस्तीसाठी मॅट पुरविणे , मागासवर्गीय वस्तीमध्ये फिरते शौचालय पुरविणे, अदिवासी वाडीमध्ये विहिरी बांधणे या कामांसाठी कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही. अंगणवाडी साहित्य पुरविणे, मुली व महिलांना जीवन कौशल्य प्रशिक्षण देणे, महिलांना कायदेविषयक सल्ला देणे, कुपोषित मुलांना अतिरिक्त आहार देणे यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. परिसर सुधारणा व सभापंडप बांधणे इत्यादी कामांसाठी १ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये इतर विकास कामांऐवजी सर्वच विभागांतून बांधकामांवर जास्त तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजकल्याण या विभागांमध्येदेखील बांधकामांसाठी सर्वाधिक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषदेचा महसुली अर्थसंकल्प सादर
रायगड जिल्हा परिषदेचा २०१३-२०१४ सालचा ५५ कोटी ७८ लाख ८५ हजार रुपयांचा मूळ महसुली अर्थसंकल्प अर्थ समितीचे सभापती संजय जांभळे यांनी आज जिल्हा परिषदेत सादर केला. जांभळे यांच्याकडे बांधकाम विभागाचे सभापतीपददेखील आहे. त्यामुळे त्यांनी सर्व विभागांमधील बांधकामांना झुकते माप दिले आहे.
First published on: 23-03-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad council district organise rally for help to drought affected area people in maharashtra