अलिबाग – रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून साडे चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

रसायनि पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरीला गेल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी रसायनि पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विवीध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील यांच्याकडून या प्रकरणाचे तांत्रिक आणि गुप्त माहितीदाराकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करण्यात त्यांना यश आले. पनवेल तालुक्यातील जाताडे येथे राहणाऱअया श्रीकांत हरीभाऊ कुरुंगळे यांने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. श्रीकांतला ऑनलाईन जुगारीचा छंद होता. मात्र यात त्याला मोठे नुकसान झाले होते. लोकांकडून उसनवारी करून कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे कर्जबाजारी पणाला कंटाळून त्याने चोरीचा करण्याचा मार्ग निवडल्याचे पोलीसांना सांगितले. त्याच्याकडून चोरी केलेले ५७ ग्रॅम वजनाचे साडेचार लाख रुपये किमतीचे दागिने पोलीसांनी हस्तगत केले आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सहा. पोलीस उप निरीक्षक राजेश पाटील, सहा.पोलीस उप निरीक्षक संदिप पाटील, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, सुधीर मोरे, रविंद्र मुंढे, प्रतिक सावंत ,राकेश म्हात्रे यांनी गुन्ह्याच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली.

Story img Loader