अलिबाग – पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी भाजपचे जिल्हा संघटक सतीश धारक, जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, गिरीश तुळपुळे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधकारी उपस्थित होते.
दिलीप भोईर यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षश्रेष्ठींकडून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पक्षादेश डावलून त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे भोईर यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात येत असल्याचे खासदार धैर्यशील पाटील यांनी जाहीर केले.
आमदार महेंद्र दळवी हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील आणि पक्षाचे पदाधिकारी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यकर्त्यांनी वैयक्तिक हेवे दावे बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे अन्यथा त्यांच्यावरही कारवाई होऊ शकेल, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.