अलिबाग : रायगड जिल्ह्यात बांबू क्लस्टर योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या उपक्रमा अंतर्गत यंदा ३५ लाख बांबूची लागवड केली जाणार आहे. कृषी, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाने यासाठी रोपवाटीका तयार केल्या असून, लवकरच या रोपांची लागवड केली जाणार आहे. किनारपट्टीवरील भागात वादळांपासून निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी या बांबूंची मदत होऊ शकणार आहे. त्याच बरोबर बुरूड समाजाला निरनिराळ्या वस्तू बनवण्यासाठी बांबू उपयुक्त ठरणार आहे.
जिल्ह्यात १ कोटी बांबू लागवडीची योजना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. या योजने अंतर्गत यावर्षी ३५ लाख बांबूची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी रोप तयार करण्यात आली असून, लवकरच या वृक्षांची लागवड सुरू केली जाणार आहे. खाजगी आणि शासकीय जमिनींवर ही लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांना पडीक जमीनी, बांधावर बांबू लागवड करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्याच बरोबार पडीक जमिन, ई क्लास जमिन, गायरान जमिन, गावठान जमिन, जलसंपदा व मृद व जलसंधारण विभागाच्या धरणाच्या बाजोला आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाने रस्त्याकरीता अधिग्रहीत केलेली जमीन व इतर कोणतेही शासकीय जमीनीवर बांबू लागवड करण्यात येणार आहे. बांबू क्लस्टर योजने अंतर्गत जिल्हा प्रशासनाने यासाठीचे नियोजन सुरू केले आहे.
शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन
शेतकऱ्यांना रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. वैयक्तिक बांबू लागवडी अंतर्गत ३ मीटर बाय ३ मीटर या अंतरानुसार १ हेक्टरमध्ये ११०० रोपांची लागवड केल्यास ३ वर्षापर्यंतच्या कालावधीत लाभार्थी यांना एकूण ७ लाख रक्कमेपर्यंतचा लाभ मजुरी व इतर खर्चाच्या स्वरुपात दिले जाणार आहे. तीन वर्षानंतर शेतकऱ्याला बांबूचे उत्पादन मिळण्यास सुरूवात होणार आहे.
बांबू लागवडीचे फायदे….
क्षारपड व नापिक जमिनीवरही बांबू लागवड करता येते. पहिली दोन वर्ष त्यामध्ये आंतरपीक घेता येते. तिसऱ्या वर्षापासून बांबूचे उत्पादन सुरू होते. जमिनीची धूप व जलसंवर्धन होते. बांबूचे जीवनचक्र ४० ते १०० वर्षाचे असते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रदीर्घकाळ यातून उत्पादन मिळू शकते.
हेही वाचा…रत्नागिरी जिल्ह्यातील काताचे अवैध कारखाने बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश
कोकणात बांबू लागवड का उपयुक्त
कोकण किनारपट्टीला गेल्या काही वर्षात निसर्ग, तौक्ते, फयान, महा, क्यार अशा वादळांचा तडाखा बसला. या वादळामुळे जिवीत हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. सामाजिक वनीकरण विभागाने किनारपट्टीवरील भागात लावलेली सुरूची झाडे वादळाचा तडाखा थोपवण्यात अपयशी ठरली. त्यामुळे वादळांना थोपवू शकतील, त्यांचा तडाखा सहन करू शकतील अशा झाडांचा शोध घेण्यात आला. तेव्हा किनारपट्टीवरील भागात बांबूची लागवड केल्यास बांबू वादळाचा तडाखा सहन करण्यास सक्षम असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे किनारपट्टीवरील भागात बांबू लागवड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बाबूंची लागवडीमुळे जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनाला मदत होऊ शकेल. त्याच बरोबार शेतकऱ्यांनी बांधावर बांबू लागवड केल्यास त्यांना जोड उत्पन्न मिळू शकेल. बुरूड समाज जिल्ह्यात मोठ्या संख्येनी राहतो. त्यांना परराज्यातून बांबू आणावा लागतो. या लागवडीमुळे बांबू जिल्ह्यात उपलब्ध होऊ शकेल. किशन जावळे, जिल्हाधिकारी रायगड…