रायगड जिल्हा परिषदेतील वरिष्ठ साहाय्यक पदावर कार्यरत असणाऱ्या जितेंद्र चिर्लेकर यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीत अर्थ व बांधकाम सभापती यांच्या दालनातच ही मारहाण करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली असून, मारहाण करणाऱ्यांची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
  या मारहाणीमागे दोन कर्मचाऱ्यांमधील वाद असल्याचे बोलले जाते आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात वरिष्ठ साहाय्यक पदावर कार्यरत असणाऱ्या जितेंद्र चिर्लेकर आणि कक्ष अधिकारी गजानन लेंढी यांच्यात वाद आहेत. याच वादातून त्यांचे दोन दिवसांपूर्वी अर्थ विभागात भांडण झाले होते. दरम्यान, आज दुपारी चिर्लेकर यांना बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या दालनात बोलवण्यात आले होते. या दालनात त्यांच्यावर लेंढी आणि त्यांच्या काही सहकार्यानी आपल्यावर हल्ला करून बेदम मारहाण केल्याचे चिर्लेकर यांनी सांगितले. लेंढी यांनी आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. बांधकाम सभापती यांच्या हस्तक्षेपामुळेच आपण बचावल्याचे चिर्लेकर यांनी पत्रकारांना सांगितले.
   या घटनेनंतर जिल्हा परिषदेत मात्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी तातडीने कामबंद आंदोलनाला सुरुवात केली असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. जितेंद्र चिर्लेकर यांना अज्ञात इसमाकडून मारहाण झाली असल्याचे कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तर बांधकाम सभापतीच्या दालनात अशा घटना वारंवार होत असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे चिर्लेकर आणि कर्मचारी संघटनेच्या माहितीत तफावत असल्याचे समोर आले आहे.
 दरम्यान, कर्मचारी संघटनेचे सर्व आरोप बांधकाम सभापती जांभळे यांनी फेटाळले आहे. आपल्यासमोर कोणालाही मारहाण झालेली नाही आणि या प्रकरणाशी आपला काही संबध नाही, असेही जांभळे यांनी सांगितले.
    या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जाईल, मात्र या कारणावरून कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

Story img Loader