अलिबाग : सामान्य प्रशासनाच्या वतीने नुकताच सुशासन निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला. यात रायगड जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. गोंदीया दुसऱ्या तर नाशिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहोचण्यासाठी सुशासन निर्देशांकासारखे उपक्रम राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. १० क्षेत्रांच्या कामगिरीच्या आधारावर मुल्यमापन करून दरवर्षी हा सुशासन निर्देशांक सामान्य प्रशासन विभागामार्फत तयार केला जातो. त्यासाठी गुणांकनही दिले जाते.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या २०२३-२४ वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, केंद्रीय कार्मिक मंत्रालयाचे सहसचिव एन. बी. एस. राजपूत यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सुशासन समितीचे पदाधिकारी यांच्यासह इतर मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या सुशासन निर्देशांकात ५२८ गुण मिळवत रायगड जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला. ५१८ गुण मिळवत गोंदीया दुसऱ्या स्थानी, तर ५१३ गुण प्राप्त करत नाशिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई उपनगर सर्वात कमी गुणांसह शेवटच्या स्थानी आहे.
हेही वाचा : गोष्ट असामान्यांची Video: मल्लखांब सातासमुद्रापार घेऊन जाणारे पद्मश्री उदय देशपांडे
जनता आणि शासन यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी हा महत्वाचा उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना देण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान सुशासन निर्देशांकात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर आणि जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी अभिनंदन केले आहे.