हर्षद कशाळकर

अलिबाग : करोडो रुपये खर्च करूनही अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य छतांना गळती लागली आहे. याशिवाय छताचे तुकडे पडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे चाळीस वर्ष जुनी पाडून नवीन इमारत बांधावी अशी मागणी केली जात आहे.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागाची इमारत १९८०-८१ साली बांधण्यात आली. त्यावेळी दोन मजली इमारतीच्या बांधकामासाठी ३४ लाख रुपये खर्च आला होता. आज या इमारतीला ४० वर्ष पूर्ण झाली आहेत. इमारतीचे बांधकाम जीर्ण झाले असून इमारत धोकादायक बनत चालली आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाढला आहे. गेल्या आठ वर्षांत इमारतीच्या देखभाल दुरुस्ती आणि सुशोभीकरणावर तब्बल १२ कोटींहून अधिकचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र तरीही  परिस्थिती फारशी सुधारलेली नाही.

ही इमारत धोकादायक झाली असल्याने ती पाडून नवीन इमारत बांधण्याची सूचना आरोग्य विभागाने बांधकाम विभागाला केली होती. त्यापूर्वी महामंडळाच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेनी इमारतीची तपासणी करून इमारत पाडून नव्याने बांधकाम करणे आवश्यक असल्याचा अहवाल दिला होता. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने या अहवालाकडे दुर्लक्ष करून २०१२ साली नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. यात इमारतीची परिस्थिती बिकट असली तरी व्यापक दुरुस्ती शक्य असल्याचा अहवाल खासगी संस्थेने दिला. यानंतर इमारतीच्या देखभालीसाठी जवळपास १२ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. दरवर्षी करोडो रुपये इमारतीच्या दुरुस्तीसाठी खर्च होत आहे.

यावर्षीही १०० खाटांच्या कोव्हिड रुग्णालयासाठी इमारतीच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी जवळपास ८० लाख रुपयांचा निधी खर्ची पडला आहे. आता इमारतीच्या रॅम्प पाडून बांधणीसाठी चाळीस लाख रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन विभागामार्फत रुग्णालयाय परिसरातील बांधाकामे आंतर्गत रस्ते आणि इतर सुविधांसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयाच्या आंतर रुग्णालय विभागाचे बांधकाम १९८० साली करण्यात आले आहे. म्हणजेच इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन ४० वर्ष झाली आहेत. इमारतीत छत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या इमारतीचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. बांधकाम विभागाला तशी विनंती केली आहे. त्यासाठी लागणारा ७ लाख २३ हजार रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडे सुपूर्द केला आहे. 

–  डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक रायगड</strong>

जुन्या इमारतीच्या दुरुस्तीवर दरवर्षी करोडो रुपये खर्च होत आहेत. पण इमारतीची परिस्थिती सुधारत नाही.  त्यामुळे या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहेच पण त्याच वेळी आजवर झालेल्या  दुरुस्ती कामांवरील खर्चाचे ऑडिट त्रयस्थ संस्थेमार्फत करून घेणे गरजेचे आहे. इमारत पाडून नवीन बांधण्याची गरज असूनही बांधकाम विभागाचे अधिकारी, रुग्णालय प्रशासन, ठेकेदार यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी वारेमाप खर्च करत आहेत.

–  मंगेश माळी, अध्यक्ष जनजागृती ग्राहक मंच.

Story img Loader