रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन मंडळाची इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली. आधुनिक इप्लोशन पद्धतीचा वापर करून पाडण्यात आलेली ही राज्यातील दुसरी इमारत ठरली आहे.
पालकमंत्री सुनील तटकरे, जिल्हाधिकारी एच. के. जावळे, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या उपस्थितीत ही इमारत पाडण्यात आली. इमारत पाडण्यासाठी जिल्ह्य़ात पहिल्यांदाच अत्याधुनिक इप्लोशन पद्धतीचा वापर करण्यात आला. यासाठी तामिळनाडूतून आलेल्या खास तंत्रज्ञांची मदत घेण्यात आली होती. इमारत पाडण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत करणे, इमारत पाडताना होणारे अपघात टाळणे आणि प्रदूषण टाळण्यासाठी अलीकडच्या काळात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आहे.
यापूर्वी मुंबईतील हायमांऊट बंगला गेस्ट हाऊसची इमारत पाडताना या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. नियंत्रित स्फोटच्या साह्य़ाने काही क्षणात ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. इमारत पाडताना फारसे नुकसान होणार नाही असे सांगण्यात आले होते. मात्र स्फोटाच्या वेळी उडालेल्या दगडांमुळे काही जण किरकोळ जखमी झाले होते. यात पत्रकारांचाही समावेश होता. मात्र त्यांना प्राथमिक उपचारही मिळू शकले नाहीत.
याच ठिकाणी आता नवीन जिल्हा नियोजन भवनाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी ८ कोटी ६० लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या दोन मजली इमारतीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला असून प्रत्येक मजल्यावर सव्वाचारशे स्वेअर मीटर असे एकूण १२७५ स्केअर मीटर बांधकाम केले जाणार आहे. यात जिल्हा नियोजन मंडळाच्या १७० लोकांना बसता येईल अशा सभागृहाचाही समावेश असणार आहे. येत्या २० मेला या नवीन इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा