रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने अलिबाग तालुका कुस्तीगीर संघातर्फे व वाडगांव ग्रामस्थ व हनुमान तालीम संघाच्या सहकार्याने रविवारी (९ डिसेंबर) वाडगांव येथे दुपारी दोन वाजता रायगड जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. गादी व माती विभागात प्रौढ गट (पुरुष), कुमार गट, महिला गट अशा या कुस्तीच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रौढ गट पुरुषांच्या गादी व माती विभागात ५५, ६०, ६६, ७४, ८४, ९६ किलो वजन गटांचा व  ८४ ते १२० किलोपर्यंत केसरी गटांचा त्यामध्ये समावेश आहे. महिला गटात ४८, ५१, ५५, ५९, ६३, ६७, ७२ किलो वजन गटांचा, तर कुमार गटात ४२, ४६, ५०, ५४, ५८, ६३, ६९, ७६ व ७६ किलो वरील गटांचा समावेश आहे. वय वर्षे १७ पर्यंतच्या कुमार गटातील कुस्तीपटूंना मुख्याध्यापकांच्या सही-शिक्क्य़ासह वयाचा दाखला सादर करणे बंधनकारक राहणार आहे. जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून निवडण्यात आलेला प्रौढ गटाचा जिल्हा संघ  २० ते २४ डिसेंबर रोजी गोंदिया येथे आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद (प्रौढ गट) स्पर्धेत सहभागी होणार आहे. कुमार गटाचा संघ व प्रौढ गटाचा संघ २७ ते ३० डिसेंबर रोजी नाशिक येथे आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद (कुमार गट) व ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहे. महिला गटाचा जिल्हा संघ  ५ ते ७ जानेवारी २०१३ मध्ये वर्धा येथे आयोजित केलेल्या राज्य अिजक्यपद (महिला) स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे वाडगांव, ता. अलिबाग येथे आयोजित केलेल्या जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेस विशेष महत्त्व आहे. रायगड जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांतील कुस्तीगीर संघाच्या प्रमुखांनी आपापल्या तालुक्यातील महिला व पुरुष कुस्तीपटूंचा संघ जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत नियोजित वेळेमध्ये उपस्थित ठेवावा, असे आवाहन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळाराम पाटील यांनी केले आहे.

Story img Loader